अकोला : शहरातील मोजक्याच गणेशोत्सव मंडळांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यातीलच एक म्हणजे खोलेश्वर परिसरातील मोहनलाल हजारीमल अग्रवाल यांच्या गणेशोत्सव मित्रमंडळाचा गणपती. या गणेश मूर्तीचा इतिहास रंजक असून, गत ६५ वर्षांपासून श्रद्धा अन् दृढ विश्वासाने ९१ वर्षीय मोहनलाल अग्रवाल हे गृहस्थ मोठ्या भक्तीभावाने या मूर्तीची स्थापना आजतागायत करीत आहेत. सध्या असलेली मुर्ती ही १९५४ मधील आहे. हे विशेष. या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाचाही संदेश आपसुकच दिला जात आहे.अकोल्यात १९५९ साली गणेश विसर्जनाच्या दिवशीच पूर आल्याने विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आली होती. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठच्या परिसरातील घरांसह जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या होत्या. त्यात विसर्जनासाठी आणलेल्या गणेश मूर्तीही वाहून गेल्या; पण पूर ओसरल्यानंतर खोलेश्वरातील मोहनलाल हजारीमल अग्रवाल यांच्या गणेशोत्सव मंडळाची मूर्ती मंडपाखाली तशीच विराजमान होती. या घटनेनंतर मोहनलाल अग्रवाल यांची गणेशावरील श्रद्धा अन् विश्वास अधिक दृढ झाला. तेव्हापासूनच त्यांनी मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्धार केला.दरवर्षी अनंत चतुर्दशीला अग्रवाल कुटुंबीय विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता ढोल-ताशांच्या गजरात गणेश मूर्ती गणेश घाटावर नेत असतात. या ठिकाणी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विधिवत पूजन करून मोर्णेचे जल शिंपडून मूर्तीला परत आणल्या जाते. आजही मोहनलाल अग्रवाल यांच्या कुटुंबीयांतर्फे या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या परंपरेमुळे एकप्रकारे पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला जातो. मोहनलाल यांची ही परंपरा त्यांची मुले व सुना भिकमचंद अग्रवाल, सुधा अग्रवाल, संजय अग्रवाल, संगीता अग्रवाल, राजेश अग्रवाल, सपना अग्रवाल, विष्णू अग्रवाल व सरला अग्रवाल चालवत आहेत.या मुर्तीच्या स्थापनेनंतर अनेक प्रसंग असे आलेत ज्यामुळे बाप्पांवरची श्रद्धा आणखी दृढ होत गेली.गणेश मुर्तीचे जतनही यामुळे शकय झाले आहे. हीच विश्वासाची परंपरा माझ्या मुलांनी कायम राखली आहे.- मोहनलाल हजारीमल अग्रवाल
६५ वर्षांपासून एकच गणेश मूर्तीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 3:27 PM