अकोला : शहरातील इस्टेट ब्रोकर उमेश राठी यांचे शनिवारी भरदिवसा १0 लाख रुपयांच्या मागणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली; मात्र खदान पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना मोठय़ा शिताफीने अटक केली असून, राठीची सुटका केली आहे. गवळीपुरा येथील रहिवासी शेख जमील शेख हमीद यांनी रणपिसे नगरातील प्रोफेसर कॉलनी येथील रहिवासी उमेश कन्हैयालाल राठी याला सात लाख रुपये व्याजाने दिले होते; मात्र त्यानंतर उमेश राठीने शेख जमील यांना रक्कम परत केली नाही. शेख जमील वारंवार त्यांची रक्कम परत मागत असतानाही राठीने पैसे दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या शेख जमील आणि राजेश शर्मा या दोघांनी शनिवारी दुपारी १ वाजता उमेश राठीला राधा कृष्णा सिनेमागृहाजवळ बोलावले, त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून वाशिम जिल्हय़ात नेले. या ठिकाणावरून राठी यांच्या निवासस्थानी फोन करून उमेश राठीच्या सुरक्षेसाठी १0 लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी होताच राठी कुटुंबीयातील दोन महिलांनी सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली; मात्र नेहमीप्रमाणे सिव्हिल लाइन पोलिसांनी दोन्ही महिलांची टोलवाटोलवी करीत त्यांना ठाण्यातून बाहेर काढले. या प्रकारानंतर महिला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्या. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी प्रकरण गांभीर्याने घेत खदान पोलिसांच्या मदतीने अपहरणकर्ता शेख जमील आणि त्याचा भाऊ शेख आरीफ या दोघांना अटक केली. त्यांच्या तावडीतून उमेश राठी याची सुटका केली.
इस्टेट ब्रोकरचे भरदिवसा अपहरण
By admin | Published: April 30, 2017 3:12 AM