- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फळांचा राजा असलेला तसेच उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्ती मोठ्या चवीने खात असलेले आंबे पिकविण्यासाठी जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १०० पार्ट पर मिलीयन यापेक्षा जास्त इथिलीनचा वापर करण्यास प्रतिबंध असताना याचा यापेक्षा अधिक प्रमाणात वापर होत असल्याने कच्ची कैरी २४ तासाच्या आतच पिकलेला आंबा बनत असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्ह्यात आंब्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने ही तुट भरुन काढण्यासाठी कच्च्या कैरीचे तातडीने आंबे तयार करण्यात येत आहेत. यासाठी घातक इथिलीन स्प्रे, चायनीज पावडर या दोन रसायनांचा वापर होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इथिलीन स्प्रे हा आंबे पिकविण्यासाठी वैध असल्याचे व तशी परवानगी असल्याचे आंबे विकणाऱ्या ठोक व्यावसायिकांचे म्हणणे आहे; मात्र या इथिलीन स्प्रेचा आणि चायनीज पावडरचा १०० पार्ट पर मिलियन (पीपीएम) यापेक्षा अधिक प्रमाणात वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत; मात्र आंबे पिकविण्यासाठी आणि व्यापाऱ्यांनी इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पहिल्या दिवशी आलेले कच्चे आंबे दुसºयाच दिवशी पिकविण्याचा अजब गजब फंडा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी कॅल्शियम कार्बोइटने आंबे पिकविण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू होता; मात्र यावर राज्यभरात छापेमारी झाल्यानंतर व्यापाºयांनी आंबे झटपट पिकविण्यासाठी दुसरा पर्याय शोधून काढला असून, इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा वापर करून काही तासातच आंबे पिकविण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये पुडित बांधलेली चायनीज पावडर टाकल्यानंतर चोवीस तासाच्या आतच आंबा पिकत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.काय आहे इथिलीन स्प्रेच्इथिलीन हा एक हायड्रोकार्बन वायू आहे. सफरचंद आणि इतर काही फळे असे आहेत जे इथिलीन तयार करतात. आंबे पिकविण्याकरितासुद्धा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या इथिलीन लिक्विड किंवा पावडरचा वापर केला जातो. त्याचा वापर १०० पीपीएमपेक्षा जास्त झाल्यास मानवी शरीरास धोकादायक असल्याची माहिती आहे.
कॅल्शियम कार्बाइड आहे घातकच्कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस हे दोन गुणधर्म असू शकतात. हे दोन्ही शरीरासाठी प्रचंड घातक आहेत. म्हणून बहुतेक देशांमध्ये फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडवर प्रतिबंध घालण्यात आले आहे; मात्र तरीदेखील महाराष्ट्रात फळे पिकविण्यासाठी तसेच आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत असल्याची माहिती सूत्रानी दिली.
कॅल्शियम कार्बाइड किंवा इथिलीन स्प्रेचा वापर करून आंबे पिकविण्यात येत असतील तर त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा व्यापाºयांवर नजर ठेवण्यात येत आहे; मात्र ही सर्व प्रक्रिया अकोला जिल्ह्याबाहेर असलेल्या काही ठिकाणच्या गोदामांवर होत असल्याची माहिती आहे, तसेच हे गोदाम वारंवार बदलण्यात येत असल्याची माहिती आहे. माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-रावसाहेब वाकडेअन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला.