- सचिन राऊत
अकोला : जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे कामकाज सुधारण्यासाठी तसेच कामकाज गुणवत्तापूर्ण पद्धतीने होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून आता प्रत्येक पोलीस स्टेशनचे मूल्यांकन सुरू करण्यात आले असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दर महिन्याला हे मूल्यांकन करण्यात येणार आहे.पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पोलीस खात्याकडून प्रदान व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या अंतर्गत एक पथक कार्यान्वित करून ते पोलीस ठाण्याचे मूल्यांकन करणार आहे. यामध्ये पोलीस स्टेशनच्या स्तरावरील कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यामध्ये गुन्हे नियंत्रण, गुन्हे प्रकटीकरण, कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी, कम्युनिटी पोलिसिंग, सीसीटीएनएसचा पोलीस कामकाजामध्ये यथोचित उपयोग करून घेणे व सीसीटीएनएसचा वापर हा पोलीस प्रशासनाकडून कशाप्रकारे करण्यात येत आहे, या सर्व बाबींचे मूल्यांकन हे पथक करणार आहे. गुन्हे शोध व प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे या सर्व कामगिरीवर त्या पोलीस स्टेशनला प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक देण्यात येणार आहेत. पोलीस स्टेशनचे प्रशासन कशाप्रकारे काम करत आहे, या सर्व कामकाजाचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन करून त्यांना कामकाजानुसार क्रमांक देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या पोलीस ठाण्यांची कामगिरी अव्वलजिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांचे सप्टेंबर महिन्यात मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सप्टेंबर महिन्यात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन, बार्शीटाकळी पोलीस स्टेशन व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आले आहेत. याप्रमाणे दर महिन्यात ही मूल्यांकन पद्धत सुरूच राहणार असल्याची माहिती आहे.