अकोला: उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. या आठवड्यात ५ मार्च रोजी हा वेग प्रतितास ११.६ मिमी होता. किमान तापमानात घट झाल्याने दोन दिवसांपासून हा दर ७.६ मिमीपर्यंत आहे.मागील चोवीस तासांत शुक्रवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित तर काही भागात किमान तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली होती. अकोल्याच्या कमाल तापमानात असाच चढ-उतार सुरू असून, गत तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने रात्रीच्या गारव्यात वाढ झाली. कमाल तापमान ३३.५ तर किमान तापमान १५.६ अंश खाली आले. मागच्या आठवड्यात हेच किमान तापमान २२ अंशांवर गेले होते. बुलडाणा येथील कमाल ३२.० तर किमान तापमान १७.० पर्यंत पोहोचले. वाशिम कमाल ३४.०, किमान १६ अंश होते. अमरावती कमाल ३४.४ तर किमान १७.४ तर यवतमाळ येथील कमाल तापमान ३३.५ व किमान १७.४ अंशांवर पोहोचले आहे.- आजारात वाढकिमान तापमानात चढ-उतार होत असल्याने सर्दी, खोकला, ताप आजार वाढले असून, वृद्ध व लहान मुलांना हा त्रास अधिक आहे. दिवसा ऊन आणि रात्री थंड या विषम वातावरणाने आजाराचे हे प्रकार वाढले असून, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढली आहे.- विदर्भात तुरळक पावसाची शक्यतादरम्यान, येत्या ११ व १२ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.