- अतुल जयस्वालअकोला : दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी लांबीच्या लोहमार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या अकोला ते पूर्णादरम्यानच्या मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होण्याला गुरुवार, ११ नोव्हेंबर रोजी १३ वर्षे पूर्ण होत आहेत. १३ वर्षे उलटून गेल्यानंतरही या मार्गाने मोजक्याच गाड्यांचे आवागमन सुरू असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील हा ब्रॉडगेज मार्ग अजूनही उपेक्षितच असल्याच्या भावना रेल्वे प्रवाशांची आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळांतर्गत येत असलेल्या पूर्णा ते अकोला या मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम नाेव्हेंबर २००८ मध्ये पूर्णत्वास आले होते. ११ नोव्हेंबर २००८ रोजी या मार्गाची चाचणी घेण्यासाठी निरीक्षण गाडी धावली होती. ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाल्यानंतर या मार्गावरून पूर्णा-अकोला ही पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आली. त्यानंतर उत्तर भारताकडे जाणाऱ्या आणखी काही गाड्या या मार्गाने वळविण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरील हिंगोली, बसमत, वाशिम, बार्शीटाकळी यासारखी महत्त्वाची रेल्वेस्थानके ब्रॉडगेजने जोडली गेली. यानंतर या मार्गाने लांब पल्ल्याच्या आणखी गाड्या सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, काही मोजक्या प्रवासी गाड्यांचा अपवाद वगळता, या मार्गाने बहुतांश मालगाड्याच धावत आहे. गत १३ वर्षांत अकोलानजीकच्या शिवणी ते वाशिमपर्यंतच या मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. अकोला ते पूर्णापर्यंत विद्युतीकरण झाल्यास नवीन गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे.
या गाड्या धावतात
- हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस
- नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस
- अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस
- अकोला-पूर्णा डेमू
- नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस
- इंदूर-अमृतसर एक्स्प्रेस
- नरखेड-काचिगुडा इंटरसिटी
- नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस
लोकप्रतिनिधींची उदासीनता
सत्तेत असतानाही लोकप्रतिनिधींकडून या मार्गाच्या विकासासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत, असे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे गत १३ वर्षांत या मार्गावर अकोल्यावरून सुरुवात होणारी एकही नवीन गाडी सुरू होऊ शकली नाही.
या आहेत प्रलंबित मागण्या
- पॅसेंजर गाड्यांची संख्या वाढविणे
- अकोला स्थानकावर पिट लाईन बनविणे
- नांदेड स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे अकोला स्थानकावरून सुरू करणे
- साप्ताहिक गाड्या दैनंदिन करणे
- अकोला - अकोट मार्ग सुरू करणे
- दक्षिण मध्य रेल्वे मार्ग मध्य रेल्वेला जोडणे
- अकोला - परळी, अकोला - पूर्णा पॅसेंजर पूर्ववत सुरू करणे