सदानंद खारोडे
तेल्हारा, दि. 8 : खारपाणपट्ट्यातील नेर फाटा येथे तीन शेतकऱ्यांनी गट करून शासकीय राष्ट्रीयीकृत बँकांनी अनुदान कर्ज नाकारल्यानंतरही खचून न जाता खासगी कर्ज घेऊन जिनिंग प्रेसिंग व्यवसाय उभारून एक आदर्श निर्माण केला. या जिनिंगमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे.
कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असताना कापसाचे भाव, कीड, रोग या सर्वांचा सामना करीत पीक उत्पादन काढीत आहेत. परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, याकरिता तालुक्यातील पंचगव्हाण येथील दिलीप महादवे टेकाडे, म. सादीक म. याकुब, रफीक खान पीर खान या तीन शेतकऱ्यांनी गट करून भांडवल जमवले. त्यानंतरसुद्धा भांडवल कमी पडत असल्याचे पाहून शासनाची मदत घ्यावी व फॅक्ट्ररी उभी करावी, याकरिता राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज मागणी केली; परंतु बँकांनी नकार दिला, टाळाटाळ केली. या सर्व अडचणीचा सामना करीत खचून न जाता खासगी कर्ज घेऊन भांडवल उभे केले. यामधून दोन कोटींची विदर्भ जिनिंग फॅक्ट्ररी, नेर या नावाने फर्म सुरू केले. यामध्ये जिनिंग, प्रेसिंग, मशनरी अद्ययावत करून परिसरातील १५ ते २० गावांना याचा फायदा झाला.
हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडवीत भाईचारा दाखवून जिनिंग सुरू केले. त्याला शेतकरीसुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत. तालुक्याला जाणे-येणे, भाडे खर्च वाचवून येथे चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. विदर्भ जिनिंगच्या माध्यमातून शेगाव पायदळ वारी करणाऱ्या भाविकांना चहा-पाणीसुद्धा जिनिंगद्वारे केले जाते. मुख्य रस्त्यावर जिनिंग असल्याने येणारे-जाणारे प्रवासीसुद्धा विसावा घेतात.