अकोला : महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात १,३३१ सौर पंप मंजूर झाले असून, यासाठी ३,२६६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंत यापैकी ८७५ शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप कार्यान्वित झाले असून, गत पाच सहा महिन्यांपासून ४५६ शेतकरी पैसे भरल्यानंतरही सौर पंपांच्या प्रतीक्षेतच असल्याचे समोर आले आहे.
सिंचनासाठी शेतकऱ्यांना विजेवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी पर्याय म्हणून महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यभरात १ लाख कृषी पंप मंजूर करण्यात आले. अकोला जिल्ह्याच्या वाट्याला यापैकी १,३३१ सौर पंप आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील ३,२६६ शेतकऱ्यांनी अर्ज केले. यापैकी ८०२ शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत. आता पर्यंत १,३७३ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा म्हणून आपल्या वाट्याची रक्कमही भरली असून, ८७५ शेतकऱ्यांना सौर पंप मंजूर होऊन त्यांच्या शेतात कार्यान्वितही झाले आहेत. दरम्यान, कोरोना संसर्ग काळात सौर पंप स्थापित करण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे गत सहा महिन्यांपासून पैसे भरलेल्या ४५६ शेतकऱ्यांना अद्यापही सौर पंपांची प्रतीक्षाच आहे.
सात कंपन्यांना कंत्राट
सात कंपन्यांना १,३३१ पंपांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी मंजूर झालेले १,३३१ पंप शेतकऱ्यांच्या शेतात स्थापित करण्याचे कंत्राट सात कंपन्यांना देण्यात आले आहे. यामध्ये सीआरआय पंप, जैन इरिगेशन, रॉमेट, राेटोमॅक, शक्ती, स्पॅन पंप प्रा. ली. व टाटा सोलर पॉवर लि. या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आतापर्यंत ८७५ शेतकऱ्यांच्या शेतात पंप कार्यान्वित केले आहेत.
शेतकर्यांना मंजूर प्रस्तावानुसार सौर पंप देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ८७५ शेतकऱ्यांच्या शेतात पंप कार्यान्वित झाले आहेत. कोरोना संकट काळात ही प्रक्रिया संथ झाली होती. आता ही प्रक्रिया गतिमान होऊन लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप स्थापित होतील.
- पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला.