लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला: काेराेनामुळे ऐन लग्नसराईचा हंगाम हातून गेल्याने आता दसरा व दिवाळी या दाेन सणांच्या अनुषंगाने हाेणाऱ्या व्यवसायासाठी कपडा बाजारपेठ सज्ज झाली असून, ग्राहकांसाठी विविध ऑफरसह सेल लागलेले आहेत. तब्बल सहा महिने ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा सुरळीत हाेतानाही व्यापाऱ्यांच्या मनातील भीती गेलेली नाही त्यामुळे दुकानांमध्ये माल भरताना बाजारपेठेचे अंदाज घेऊनच दिवाळी, दसऱ्याचे वेध कपडा बाजाराला लागले आहेत.
अकाेला शहरातीत कपडा बाजारपेठ ही पश्चिम वऱ्हाडातील सर्वात माेठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांनी आपले प्रतिनिधी थेट दुकानांमध्ये ठेवले आहेत. सर्वच नामांकित कंपन्यांची दुकाने आहेतच. साेबतच वर्षानुवर्षांची परंपरा असलेली नामांकित दुकानेही ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली आहेत. सध्या तरी दुकानांमध्ये अकाेल्यातीलच गर्दी आहे. काेराेना नियमांचे पालनही झाले पाहिजे अन् व्यवसायही, अशी कसरत बाजारपेठेत पाहावयास मिळते.
कॅटलाॅग महिला साडी खरेदीसाठी आल्यानंतर कॅटलाॅगमधील डिझाइन पाहून साडीची निवड केली जात आहे. काही दुकानांनी साडी खरेदी केल्यास पिकाे-फाॅल माेफत, अशी सवलत दिली आहे.
कपडा मार्केट हे सर्वात माेठे आहे. अनेक लहान-माेठी दुकाने आहेत. सर्वांनाच काेराेनामुळे फटका बसला. नागरिकांच्याही उत्पन्नात घट झाल्याने साहजिकच ग्राहकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेचे अंदाज घेऊनच दिवाळी, दसऱ्याची तयारी सुरू केली आहे. सध्या स्थानिक ग्राहकांचा ओढा आहे.
- ओम साव कपडा व्यापारी