अकोला : नाग म्हटला की आपसूकच अंगावर काटा येतो. साप म्हणजे शत्रू असल्याचे पिढ्यान्पिढ्या मनावर बिंबवले जाते. त्यामुळे साप मारण्याचाच प्रकार सर्वत्र बघायला मिळतो. विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला, हे ओळखता न आल्याने अज्ञानातूनच साप मारले जातात. साप म्हटले की त्यापाठोपाठ येते भीती आणि अंधश्रद्धा. या कारणांमुळेच साप दिसला की मारला जातो. असे हजारो साप भारतात अज्ञानापोटी मारल्या जातात, अशी माहिती अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य व विज्ञान शिक्षक धर्मदीप इंगळे यांनी दिली.पृथ्वी सरपटणाऱ्या प्राण्यांचीच होती. आपण पृथ्वीवर पाहुणे आहोत. आपण त्यांचे घर त्यांच्याकडून हिरावून घेतले आहे. खरे पाहिले तर मानव जातीनेच त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केले आहे. पृथ्वीवर जवळपास अंदाजे ३ हजार सापांच्या ज्ञात प्रजाती असून, त्यापैकी फक्त ३00 च्या जवळपास प्रजाती भारतात आढळतात. त्यापैकी फक्त ५0 च्या जवळपास सापाच्या जाती महाराष्ट्रात आढळतात आणि त्यापैकी फक्त पाच प्रजाती विषारी आहेत आणि उर्वरित बिनविषारी आहेत. जगातील सर्वात विषारी सर्प समुद्री साप आहेत. महाराष्ट्रात मण्यार, घोणस, नाग, फुरसे, पट्टेरी मण्यार हेच विषारी साप आढळतात. साप जेवढा शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्याहून अधिक तो सबंध पृथ्वीवरील मानवजातीचा मित्र आहे. कारण जवळ जवळ ३0 टक्के औषधांमध्ये सर्पविष औषध म्हणून वापरले जाते. अंगदुखी, कॅन्सर; तसेच भूल देण्याच्या इंजेक्शनमध्ये सर्प विषाचा वापर होतो. म्हणूनच साप हा मानवाचा मित्र आहे.
साप दूध पित नाही!सर्व साप हे मांसाहारी आहेत. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, पाली, छोटे पक्षी आदी सापाचे अन्न आहे. साप दूध पित नाही. सापाला दूध पाजल्यास सापाच्या अन्ननलिका, श्वसनसंस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. दूध हे सापाला विषासारखे आहे.नागमणी एक अंधश्रद्धाकोणत्याही नागाच्या डोक्यावर नागमणी नसतो. गारुडी नागमणी म्हणून जे दाखवतात तो काचेचा, असबेस्टसचा खडा असतो.अंधश्रद्धेतून मांडूळ सापाची तस्करीजमिनीखाली आढळणारा अत्यंत शांत स्वभावाचा मांडूळ साप. शेपटीकडील बाजू ही तोंडासारखी आकाराने असते. त्यामुळे या सापाला दुतोंड्या असेही म्हटले जाते; परंतु अलीकडच्या काळात मांत्रिक-तांत्रिकांकडून मांडूळ सापांना पकडून मंत्रविधी केल्याने पैशांचा पाऊस पडतो, घरात ठेवल्याने धनलाभ होतो, बुटक्या माणसाची उंची वाढते, कॅन्सरवर रामबाण इलाज या अफवांमुळे या सापाची तस्करी होते; परंतु या सर्व अंधश्रद्धा आहेत.सापांबद्दल समज, गैरसमजसाप डूक धरतो का?सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. त्यामुळे साप डूक धरणे व बदला घेणे, ही गोष्ट अशास्त्रीय आहे. त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती लक्षात ठेवून साप डूक धरत नाही.
सर्प विषावर मंत्रोपचार चालतो का?सर्पदंशावर सर्पप्रतिबंधक इंजेक्शनच इलाज आहे. विषारी साप चावल्यावर मंत्रतंत्र, जडीबुटीचे औषध, अंगारे-धुपारे, भस्म आयुर्वेदिक व तत्सम औषधांचा उपयोग होत नाही.रात्री शेतकरी काठी का आपटतो?काठी आपटल्याने उत्पन्न होणाºया ध्वनीलहरींची संवेदना सापांना जाणवते. ही संवेदना सुमारे ५0 फूट अंतरावरून सापांना जाणवते. त्यामुळे वाटेत असलेला साप बाजूला निघून जाऊ शकतो. त्यामुळे आडवाटेत साप येणे किंवा सापावर पाय पडणे अशा घटना टाळू शकतो.