अकोला : १२० मायक्रॉनपेक्षा जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असली तरी या पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने आज रोजी अकोला शहराची ओळख प्लास्टिक पिशव्यांच्या कचऱ्यांचे शहर झाले आहे.
पर्यावरणासाठी काम करणाऱ्या निसर्ग कट्टा या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात दररोज ९ हजार प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून, या पिशव्यांमुळे शहराच्या पर्यावरण प्रदुषणात भर पडत आहे. महानगरपालिकेच्या बाजारवसुलीनुसार अकोला शहरात भाजीविक्रेते, फुले हार व बुके, मांस विक्रीचे दुकाने, हात गाडीवर फळ व भाजी विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते यांची संख्या जवळपास १८०० आहे.
दररोज एक विक्रेता प्लास्टिकच्या पिशव्यांचे एक पाकीट घेतो त्यामध्ये १०० प्लास्टीकच्या पिशव्या असतात. एका विक्रेत्याकडून दररोज ८० ते १०० प्लास्टीकच्या पिशव्या विविध मालासोबत दिल्या जातात. कमीत कमी ५० पिशव्या जरी पकडल्या तरी १८००x ५० = ९००० ही धक्कादायक संख्या येते. या विक्रेत्यांसोबतचे अनेक दुकानदारही सरसकट प्लास्टीकच्या पिशव्यांमधूनच माल देतात. वरील आकड्यांचा विचार केला अकोल्यात एका दिवसात किती प्लास्टिक कॅरी बॅग वातावरण दुषित करतात, याची कल्पना येते.
प्लास्टिक पिशवी देणाऱ्याला पाच हजार रुपये व घेणाऱ्याला दोन हजार रुपये दंड केल्या जाऊ शकतो. हा कायदा अंमलात आणला तर अकोला महानगरपालिकेचे उत्पन्न वाढु शकते. हा कायदा कठोरपणे राबविला तर प्लॅस्टीक पिशव्यांची समस्या दुर होऊन स्वच्छ अकोला- सुंदर अकोला हि कल्पना प्रत्यक्षात येऊ शकते.- अमोल सावंत, संस्थापक, निसर्ग कट्टा, अकोला