अकोला, दि. २२- अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक दररोज सरासरी तीन, साडेतीन हजार क्विंटल असून, दर सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार १९0 रुपये आहेत. नाफेडकडे होणारी तूर उत्पादक शेतकर्यांची हेळसांड बघता शेतकरी बाजारात तूर विक्रीला आता पसंती देत आहेत. दरम्यान, हरभर्याच्या दरात अल्पशी वृद्धी झाली आहे. यावर्षी विक्रमी तुरीचे उत्पादन होणार, याची शासनाला माहिती होती; परंतु नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू करताना आवश्यक खरेदी यंत्रणा,गोण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी, शेतकर्यांना नाफेडला तूर विकताना प्रचंड अडचणी येत आहेत. एफएक्यू दर्जाच्या नावाखाली शेतकरी नाडला जात आहे. या सर्व पृष्ठभूमीवर वैतागलेल्या शेतकर्यांना बाजार जवळ करावा लागला असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी तीन ते साडेतीन हजार क्विंटल तुरीची आवक आहे. मंगळवारी ही आवक ३ हजार ३८२ क्विंटल होती. मंगळवारी हरभर्याची आवक २,५८३ क्विंटल होती. दरही मागील आठवड्याच्या तुलनेत वाढले आहेत. मंगळवारी हरभर्याचे दर सरासरी ५,२५0 रुपये प्रतिक्विंटल होते. सोयाबीनची आवक २,६७७ क्विंटल होती, दर सरासरी २,६२५ रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. हरभरा आणि सोयाबीनच्या दरात येथे अल्पशी वाढ झाली आहे. मुगाचा दर मंगळवारी सरासरी ५,१७५ रुपये प्रतिक्विंटल होता. आवक ११३ क्विंटल होती. बाजारात सध्या गव्हाची आवकही वाढत आहे. मंगळवारी २६२ क्विंटल गहू विक्रीस आला. गव्हाचे दर सरासरी १,६२५ रुपये प्रतिक्विंटल होते. आता नवीन गहू येण्यास सुरुवात झाली आहे, तशी मागणीही वाढत आहे. पांढर्या हरभर्याचे दर चढेच आहेत.
बाजारात दररोज सरासरी साडेतीन हजार क्विंटल तुरीची आवक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 2:43 AM