अकोला : शितल व धवल प्रकाश देणारा चंद्र हा नेहमीच आकर्षक भासतो. पौर्णिमेच्या चंद्राची बात काही औरच असते. पृथ्वी व चंद्र यामधील अंतर हे मंगळवार, १४ जून रोजी कमी होणार असल्यामुळे या दिवशी पौर्णिमेचा हा चंद्र त्याच्या नेहमीच्या आकारापेक्षा मोठा दिसणार आहे. या खगोलीय स्थित्यंतराला सुपरमून असे संबोधले जात असून, हा अभूतपूर्व नजारा अकोलेकरांना ‘याची देही याची डोळा’ पाहता येणार आहे. पृथ्वी-चंद्र हे अंतर नेहमी सरासरी ३ लाख ८५ हजार किलोमीटर असते, परंतु मंगळवार, १४ जून रोजी हे अंतर सरासरी ३ लाख ५७ हजार ४३६ किलोमीटर कमी राहील. त्यामुळे चंद्रबिंब मोठे व प्रकाशमान दिसेल, चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. सुपरमूनच्यावेळी चंद्र हा त्याच्या नेहमीच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा दिसतो. तर त्याचा प्रकाश हा ३३ टक्के अधिक असतो. पाश्चात्य देशांमध्ये यावेळी स्ट्रॉबेरीचा हंगाम असतो. त्यामुळे त्याला स्ट्रॉबेरी सुपरमून म्हणूनही ओळखले जाते, असे खगोल अभ्यासक तथा विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
यावर्षीचा पहिला सुपरमून
वर्ष २०२२ मध्ये सुपरमूनची स्थिती तीन वेळा होणार आहे. मंगळवारी दिसणारा सुपरमून हा यावर्षीचा पहिला सुपरमून असणार आहे. या दिवशी पृथ्वी व चंद्रातील अंतर सर्वात कमी असणार आहे. त्यानंतर अशी स्थिती बुधवार, १५ जुलै व शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी असणार आहे. जुलै महिन्यात ढगाळ वातावरणामुळे सुपरमूनच्या दर्शनाबाबत खात्री देता येत नसली, तरी १४ जूनचा सुपरमून अकोलेकरांना बघता येईल हे मात्र निश्चित.
चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना ज्या दिवशी पृथ्वीच्या खूप जवळ येतो त्या स्थितीला सुपरमून असे म्हटले जाते. या दिवशी चंद्रबिंब अधिक मोठे व अधिक प्रकाशमान भासते. नागरिकांनी हा खगोलीय नजारा अवश्य पहावा.
- प्रभाकर दोड, खगोल अभ्यासक, अकोला