अकाेला : कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असतानाच निवडणूकीची रणधुमाळीही वेग धरत आहे त्यामुळे प्रशासनाने निवडणुकी प्रक्रिया राबवितानाच काेराेनाच्या प्रतिबंधाचीही काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन दक्ष् आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना भेटून प्रचार करण्यावर भर असताे त्यातही प्रचाराला अल्प वेळ मिळत असल्याने व प्रभाग पद्धती असल्यामुळे प्रभागात किंवा आपल्या गटाचे सर्व उमेदवार विजयी व्हावे, म्हणून जिल्हास्तरावरील नेत्यांच्या सभा मेळावे घेण्याकरिता ग्रामपंचायत उमेदवार आग्रही असतात. प्रत्येक घरातील मत आपल्याला मिळावे म्हणून उमेदवार थेट मतदारांच्या किचनपर्यंत पोहोचतो. हस्तांदोलन करतो. अशावेळी आजारी रुग्णांची ही भेट घेणे उमेदवार टाळत नाहीत त्यामधूनच कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निवडणुकीत कार्यरत असलेल्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक व दोन तसेच निवडणूक कार्यात असलेले तलाठी, ग्रामसेवक, भरारी पथक, कोतवाल यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले. पहिल्या प्रशिक्षणात या कर्मचाऱ्याना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.
निवडणुकीतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपली कोविड चाचणी करून घेणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने याबाबत नियाेजन केले आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी