अतुल जयस्वाल, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असले, तरी चालू वर्षात जुलै महिन्यापर्यंत राज्यातील १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)च्या संकेतस्थळावर आहे. यावरून राज्यात महिन्याला सरासरी दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
संवर्धनाचे प्रयत्न
भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या वाघाला संरक्षण लाभले असून, वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. यानंतरही शिकार, नैसर्गिक मृत्यू, अपघात, आपसातील झुंजी आदी कारणांमुळे दरवर्षी वाघांचे मृत्यू होतात. देशभरात विविध कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ठेवते.
वाघांसाठी अभयारण्ये सुरक्षित
तीन वाघांचा मृत्यू (पेेंच- १, ताडोबा- २) अभयारण्याच्या हद्दीत झाला, तर उर्वरित ११ वाघ अभयारण्याबाहेर मृत्युमुखी पडल्याची नोंद ‘एनटीसीए’च्या संकेतस्थळावर आहे.
जानेवारीत सर्वाधिक मृत्यू
१४ वाघांपैकी पाच वाघ एकट्या जानेवारी महिन्यात दगावले. फेब्रुवारी महिन्यात दोन, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये एक, तर मे मध्ये तीन वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.