अकोला: आपण सेवा बजावीत असलेल्या कार्यालय व त्या परिसरात निरंतर स्वच्छता राखण्यासाठी सर्वांचा निरंतर व सक्रीय सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले. विद्युत भवन कार्यालय व परिसरात स्वच्छता अभियानाच्यासमारोप प्रसंगी संवाद साधताना ते बोलत होते.मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेमध्ये मुख्य अभियंत्यासह, अधिकारी आणि जनमित्रांनी सक्रीय सहभाग घेत विद्युत भवनातील महावितरण व महापारेषचे सर्वच कार्यालय व परिसरातील अनावश्यक कचरा साफ करीत निरुपयोगी कागदपत्रे आणि साहित्य याची विल्हेवाट लावण्यात आली. या सोबतच महावितरणच्या चाचणी विभाग, ग्रामीण विभाग, उपविभागीय कार्यालये येथे सुद्धा या वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.विद्युत भवन येथील अभियानात मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, राहुल बोरीकर, कार्यकारी अभियंते संध्या चिवंडे, प्रशांत दाणी, अजय खोब्रागडे, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, महापारेषचे अधिक्षक अभियंते सुधीर ढवळे, कार्यकारी अभियंता अंबादास जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता(स्थापत्य) कविता देशभ्रतार, मनोज नितनवरे, तसेच अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र व महावितरणच्या विविध संघटनांचे पदाधिकारी तथा महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.या मोहिमेत अकोला महानगर पालिकेची मदत व सहकार्य लाभले याबद्दल मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते महानगर पालिकेच्या उपस्थित अधिकारी खंडारे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले.