अयाेध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्यदिव्य मंदिर उभारले जाणार आहे. या निर्माणकार्यात सर्वांचा सहभाग असावाल, या उद्देशातून श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट, विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांकडून आर्थिक सहयोग घेण्यासाठी मकरसंक्रांतीच्या दिवसापासून अभियान राबविल्या जाणार आहे. या अभियानात जातपात,पंथ, भेदभाव विसरून प्रत्येकाने योगदान देण्याच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने शुक्रवारी मराठा मंगल कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, महापाैर अर्चना मसने, तेजराव थोरात, वसंत बाछुका, सतीश ढगे, याेगीता पावसाळे, अश्विनी हातवळणे आदी उपस्थित हाेते. आयाेजित मेळाव्यात बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख,नगरसेवक तसेच सक्रिय सदस्य माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
संघटनेच्या बळावर निवडणुकीत विजय
महाविकास आघाडी सरकारच्या बळावर महापालिकेत विराेधकांकडून विकासकामांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. संघटनेच्या बळावर मनपाच्या आगामी निवडणुकीतही भाजपचाच विजय हाेणार असल्याचा दावा आमदार गाेवर्धन शर्मा यांनी यावेळी केला.
विराेधक हताश; चाैकशीत काहीही साध्य नाही
राज्य सरकारच्या पदराआडून मनपात विराेधकांकडून चाैकशीचा ससेमिरा लावल्या जात आहे. त्यामधून काहीही साध्य हाेणार नसल्याचा विश्वास महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. मागील सहा वर्षांत शहरात विकासकामे झाली असून, जनतेपर्यंत पाेहाेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.