- संतोष येलकर
अकोला : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) मतदान प्रक्रियेचे धडे आता राज्यातील गावा-गावांत दिले जाणार आहेत. मतदार जागृतीचा हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.२०१९ मध्ये होणाºया आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ‘ईव्हीएम’द्वारे मतदान प्रक्रियासंदर्भात मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ‘ईव्हीएम’द्वारे मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेत ‘व्हीव्हीपॅड’चा वापर, मतदान कसे करावे, यासंदर्भात राज्यातील गावा-गावांत मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती देण्यात येणार आहे. ‘ईव्हीएम’द्वारे मतदानासंदर्भात मतदार जागृतीचा हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाचे प्रस्ताव राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निवडणूक विभागाकडून मागविण्यात आले आहेत. त्यानुसार गावपातळीवर मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रियेचे मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्याच्या उपक्रमाचे करण्यात आलेल्या नियोजनासंबंधीचे प्रस्ताव राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निवडणूक विभागामार्फत लवकरच राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.उपविभाग स्तरावरून मागितले नियोजनाचे प्रस्ताव!‘ईव्हीएम’द्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक गावपातळीवरील मतदान केंद्रांवर मतदारांना दाखविण्याचा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून नियोजनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निवडणूक विभागामार्फत मागविण्यात आले आहेत. उपविभाग स्तरावरून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ‘ईव्हीएम’द्वारे मतदानाचे मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ‘ईव्हीएम’द्वारे मतदान प्रक्रियासंदर्भात मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी गावा-गावांत मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा प्रस्ताव सोमवारी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.- वैशाली देवकर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अकोला.