नितीन गव्हाळे, अकोला: फ्लॅट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती विजयसिंग सोळंके यांना मुंबईतील गावदेवी पोलिसांनी मंगळवारी सकाळी कुटासा येथे जाऊन अटक केली आहे.
विजयसिंग सोळंके यांना मावशीकडून वारसा हक्काने एक फ्लॅट मिळालेला आहे. तो फ्लॅट मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील शुभकर्म गृहनिर्माण सोसायटीत आहे. वन बीएचके असलेली ही सदनिका ५० लाखात विकत घेण्यासाठी प्राप्तीकर (इन्कमटॅक्स) विभागाचे तत्कालीन अधिकारी विजय कुमार कोहाड यांनी २०१३ मध्ये तयारी दर्शविली. त्यानुसार सप्टेंबर २०१३ मध्ये कोहाड आणि सोळंके यांच्यात सहमती झाल्यानंतर कोहाड यांनी सोळंके यांना सदनिका विकत घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने ऑगस्ट २०१४ पर्यंत ३२ लाख ५० हजार रुपये दिले. फ्लॅटच्या मूळ मालक या सोळंके यांच्या मावशी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व वारसा हक्क प्रक्रियेंतर्गत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोळंके यांना या फ्लॅटचा ताबा मिळाला होता. सोसायटीकडून या फ्लॅटला ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हा फ्लॅट कोहाड यांच्या नावाने हस्तांतरित करून विक्री प्रक्रिया करण्याचे ठरले होते. मात्र, त्यानंतर गेली १० वर्षे फ्लॅटची विक्री करण्यास (रजिस्ट्री करण्यास) आणि ताबा देण्यास सोळंके यांनी टाळाटाळ सुरू केली. सोसायटीची एनओसी मिळाली नाही, असे कारण देत त्याने रजिस्ट्री करून देण्यास चालढकल केली. त्यानंतर विजयकुमार कोहाड यांनी ३० एप्रिल २०२२ ला पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हा फ्लॅट आरोपी सोळंके यांनी २०१८ मध्ये परस्पर दुसऱ्याला विकल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुंबईतील गावदेवी पोलिसांनी अकोट तालुक्यातील कुटासा येथे दाखल होत सोळंके यांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
कोण आहे विजयसिंग सोळंके?
विजयसिंह शंकरसिंह सोळंके हे मूळ अकोट तालुक्यातील कुटासा येथील आहे. त्यांचे मुंबईत व्यवसायानिमित्त जाणे येणे असते. सोळंके अकोला जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण समिती सभापती असून, सध्या भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत.
फ्लॅट विक्रीच्या फसवणूक प्रकरणात विजयसिंग सोळंके यांच्या विरूद्ध गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात कुटासा येथून मंगळवारी पहाटे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.- रमेश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, गावदेवी पोलिस ठाणे मुंबई