अकोला: राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी माहिती मागविली होती. आतापर्यंत १२५ शाळांनी ५ हजार ८३२ विद्यार्थ्यांची माहिती दिली असून, या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. इतर शाळांकडून विद्यार्थ्यांच्या माहिती प्राप्त झाल्यानंतर या संख्येत वाढ होईल.फेब्रुवारी व मार्च २0१९ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती माध्यमिक शिक्षण विभागावतीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणार आहे. शासनाच्यावतीने सतत तीन वर्ष जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले होते; परंतु अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहितीच सादर केली नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. यंदा तसे होऊ नये आणि शासनाने यंदाही दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांची नावे, बँक खात्यांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाने मागविली आहे.शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी माहिती सादर केल्यास, त्यांच्या नावाने धनादेश काढून, बँक खात्यांमध्ये हे माफ केलेले परीक्षा शुल्क तातडीने जमा व्हावे, या दृष्टिकोनातून शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती, बँक खाते क्रमांकांची माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केली आहे. विद्यार्थ्यांची विद्याशाखा, बैठक क्रमांक, नाव, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे गाव, मोबाइल क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, शाखा आणि आयएफसी कोड आदी माहिती पाठविण्यात आली असून, ही माहिती लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यातील अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती पाठविलेली नाही. त्यांनी तातडीने माहिती पाठवावी. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ न मिळाल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. (प्र्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने माफ केले. त्यासाठी शाळांकडून माहिती मागविण्यात आली. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी तातडीने माहिती सादर करावी. विद्यार्थ्यांना शुल्क माफी न मिळाल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.-प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी, माध्यमिक