अकोला : जिल्ह्यातील शेती ही खारपाणपट्याची असून या सर्व शेतीचे मृदा आरोग्य पत्रिका (soil health card mission ) योजने अंतर्गत शेतीचे माती परीक्षण करून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासन म्हणून उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन ना.पुरुषोत्तम रुपाला यांनी केले.
अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, व युपीएल च्या वतीने आयोजित शासकीय अधिकारी,किटकनाशक उत्पादक व शेतकरी यांची आढावा बैठक व शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ दिलीप मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड,आमदार गोवर्धन शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, कृषी अधीक्षक मोहन वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, युपीएलचे रज्जूभाई श्रॉफ, सॅन्ड्रा श्रॉफ, अजित कुमार, समीर टंडन यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. रूपाला पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीतील खर्च कमी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होईल, यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती,नवतंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.शेतीच्या विविध प्रयोगासाठी लागणारी यंत्रे अनुदानित तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी केंद्रीय कृषि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला तर शेतकऱ्यांनी शेतातील प्रयोगाबाबत आपले अनुभव कथन केले.