लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागांमध्ये ठिकठिकाणी खोदकाम करून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असून, रस्ता खोदताना कंत्राटदाराकडून सर्व निकष, नियम धाब्यावर बसविल्या जात असल्याचे चित्र आहे. खोदकाम केल्यानंतर रस्ता दुरुस्तीकडे पाठ फिरविल्या जात असताना महापालिका प्रशासन व मजीप्रा ढिम्म आहेत. खोदलेल्या रस्त्यातून वाट काढणाऱ्या अकोलेकरांबद्दल सत्ताधारी भाजप व प्रशासन ‘बेफिकीर’ असून, सत्तापक्षाने साधलेल्या सोयीस्कर भूमिके मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. या दोन्ही योजनांचा आवाका पाहता त्यावर देखरेख ठेवणाºया मजीप्राची प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली असता कंत्राटदाराने चार टक्के जादा दराने सादर केलेली निविदा मनपाने मंजूर केली. सदर कामाचा कंत्राट ‘एपी अॅण्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला असून, कंत्राटदाराकडून मुख्य रस्ते व रस्त्यालगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकली जात आहे. करारनाम्यानुसार खोदकाम केलेले मुख्य रस्ते व प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती क्रमप्राप्त असताना त्याकडे कंत्राटदाराने सपशेल पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांच्या नाकीनऊ आले आहेत.मजीप्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हहद्दवाढीचा भाग वगळता संपूर्ण शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. प्रभागातील अंतर्गत कामाचा दर्जा योग्यरीत्या नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मजीप्राच्या अकार्यक्षमतेमुळे कंत्राटदाराचे फावत आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रोखठोक भूमिका घेण्याची गरज असताना त्यांनी साधलेल्या चुप्पीमुळे अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
आयुक्त साहेब, तुम्हीच सांगा...मुख्य रस्त्यांलगत तसेच प्रभागात जलवाहिनीची कामे सुरू आहेत. प्रभागात गल्लीबोळात ११० एमएम (४ इंच), २०० एमएम (८ इंच), २५० एमएम ते ४५० एमएम जलवाहिनी टाकल्या जात आहेत. चौका-चौकात नव्याने तयार केलेले रस्ते खोदल्या जात असून, काही ठिकाणी एकच रस्ता पाच ते सहा वेळा खोदल्या जात आहे. रस्ता बुजविण्यासाठी मुरुमाचा वापर न करता तीच माती टाकल्या जात आहे. त्यातून वाट काढताना नागरिकांची दमछाक होत असल्यामुळे आयुक्त साहेब, तुम्हीच सांगा ही समस्या कधी निकाली काढता, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.