लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून शंभर मीटरच्या आत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे; मात्र कवठा येथील नदीपात्रात बॅरेजच्या कामासाठी पाणी पुरवठा करणार्या विहिरीच्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल्याचे लोकमतने ८ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. कवठा बॅरेजचे काम सध्या सुरू आहे. या बॅरेजच्या कामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील एका कंत्राटदाराने रेती पुरवण्याचा कंत्राट घेतला आहे. पाणी पुरवठा योजनेच्या जवळपास १00 मीटरपर्यंत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी लादलेली आहे; मात्र तरीही कवठा गावाला पाणी पुरवठा करणार्या विहिरीजवळ मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल्याचे लोकमतने ८ डिसेंबर रोजी केलेल्या स्टिंगमध्ये समोर आले आहे. या खड्डय़ांमुळे विहिरी खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कवठा गावात सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यातच ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशात या खड्डय़ांमुळे विहीर कोसळल्यास गावात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. विहिरींपासून अवघ्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या खड्डय़ांतून रेतीचे उत्खनन होत असताना महसूल विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.कवठा गाव खारपाणपट्टय़ात येत असून, नदीपात्रातील पाण्यावरच ग्रामस्थांची तहान भागवल्या जाते. ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी नदीच्या पात्रात विहीर खोदण्यात आलेली आहे. या विहिरीच्या बाजूलाच मोठमोठे खड्डे खोदून रेतीचे उत्खनन करण्यात येत असल्याचे समोर आले.
कवठा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळ रेती उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल. - दीपक पुंडे, तहसीलदार, बाळापूर.
कवठय़ाच्या रॉयल्टीवर लोहार्यात उत्खनन!लोहारा येथील नदी पात्रातील रेती घाटातील स्थळांचा लिलाव झालेला नसताना कवठय़ा येथील स्थळांच्या रॉयल्टीवर रेतीचे उत्खनन करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. उत्खनन करण्यासाठी नदीपात्रात २0 ते २५ फूट खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यामुळे, त्यामध्ये मजूर दबून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोहारा रेतीघाट लिलाव झाला नसताना कवठा घाटाच्या रॉयल्टीवर त्यांना लांबी ६00 मीटर रुंदी ६ मी. व खोल 0.५0 मीटर रेती उत्खननाचा आदेश असताना सर्रास या घाटावरून २0 ते २५ फूट खोल खड्डे करून, अवैध रेती उत्खनन सुरू आहे. याबाबत शेतकर्यांनी विचारपूस केली असता आमचेजवळ कवठय़ाची रॉयल्टी असल्याचे ते सांगतात, या घटनास्थळावर मंडळ अधिकारी पी. एम. मांजरे, तलाठी भानुदास म्हस्के यांनी दोन वेळा पाहणी केली. मात्र कारवाई करण्यात आलेली नाही.
मोठ मोठे खड्डे खोदून अवैध रेती उत्खनन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच रेती चोरावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करू. - डी.पी. पुंडे, तहसीलदार बाळापूर-