संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील तात्पुरत्या परवानाधारक आणि लीजवर देण्यात आलेल्या खदानींमधील उत्खननाची मोजणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा भूमी अभिलेख विभाग व बांधकाम विभागाला दिला आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांकडून जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाचे ‘इटीएस’ मशीनद्वारे मोजमाप लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
खदानींमधील गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतुकीपोटी खदानधारकांनी शासन खात्यात जमा केलेली स्वामीत्वधनाची (राॅयल्टी) रक्कम आणि त्या तुलनेत प्रत्यक्ष खदानीतून करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील खदानींमधील उत्खननाची ‘इटीएस’ मशीनद्वारे मोजणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना गेल्या २० ऑक्टोबर रोजीच्या पत्राद्वारे दिला आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांकडून जिल्ह्यातील तात्पुरत्या परवानाधारक खदानी आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी लीजवर देण्यात आलेल्या खनिपट्ट्यांमधील उत्खननाचे ‘इटीएस’ मशीनद्वारे मोजमाप लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या तपासणीत जिल्ह्यातील खदानींमधील गौण खनिजाच्या उत्खननाचे वास्तव समोर येणार आहे.१६८ खदानींचे होणार मोजमाप!जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील १६८ खदानींमधील गौण खनिज उत्खननाचे ‘इटीएस’ मशीनद्वारे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यामध्ये तात्पुरत्या परवानाधारक १०२ खदानी आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी लीजवर देण्यात आलेल्या ६६ खनिपट्ट्यांचा (खदानी) समावेश आहे.
तपासणीसाठी मागविले गट नंबर, सातबारा!खदानींमधील गौण खनिजाची इटीएस मशीनद्वारे मोजणी करून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत जिल्ह्यातील संबंधित खदानींचे गट नंबर आणि सातबारा महसूल विभागाला मागविले. त्याअनुषंगाने खदानींचे संबंधित दस्तऐवज उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत.जिल्ह्यातील खदानींमधील गौण खनिजाच्या उत्खननाची तपासणी करण्यासाठी ‘इटीएस’ मशीनद्वारे मोजमाप करण्याचा आदेश जिल्हा भूमी अभिलेख विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांकडून खदानींमधील उत्खननाचे मोजमाप करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे.अजित कुंभार, जिल्हाधिकारी