खेट्री : पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणाच्या जागेतून गत महिनाभरापासून वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू आहे. वाळूचे उत्खनन करणाऱ्यांनी मोठमोठे खड्डे केल्यामुळे किरकोळ घटना घडल्या असून, मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील पशुपालक गावठाणात जनावरे चारण्यासाठी सोडतात; परंतु गावठाणाच्या जागेत वाळू माफियांनी खड्डे केल्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. वाळूचे उत्खनन गावातील एका राजकीय पुढाऱ्याकडून हाेत असल्याची चर्चा आहे.
राजकीय पुढाऱ्यांचा गावात वचक असल्याने तक्रार करण्याची कुणी हिंमत दाखवत नाही, तसेच महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई केली जात नाही, त्यामुळे वाळूचे उत्खनन करून रात्रंदिवस अवैध वाहतूक सुरू आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडल्याचे चित्र आहे. उत्खनन थांबवून उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत तलाठ्यांशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
जवळपास दोनशे ब्रास झाले वाळूचे उत्खनन
गावठाणाच्या जागेतून महिनाभरापासून जवळपास दोनशे ब्रास वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक केल्याचे दिसून येत आहे. यावर महसूल विभाग काय कारवाई करणार, याकडे गावासह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
..........
महसूल विभागावर राजकीय दबाव
तुलंगा खुर्द येथे गावठाणच्या जागेतून एका राजकीय पुढारी मजुरांद्वारे उत्खनन करून अवैध वाहतूक करीत आहे. महसूल विभागावर राजकीय दबाव असल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. वरिष्ठांनी दाखल घेणे गरजेचे आहे.
...............................
दरड कोसळल्याच्या घटनेत वाढ
गावठाणच्या जागेतून मजूर वाळूचे उत्खनन करतात. त्यामुळे अनेक वेळा दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मजुरांना किरकोळ इजासुद्धा झाल्याचे बोलले जात आहे. जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...................
तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी
तुलंगा खुर्द येथील तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी आहे. त्यामुळे बिनधास्त वाळू माफिया उत्खनन करून अवैध वाहतूक करीत आहे. तलाठ्यावर वरिष्ठांचा वचक नसल्याने तलाठी दिवसातसुद्धा फिरकत नाही.