लोकमत इफेक्ट
खेट्री: पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द गावाला लागून असलेल्या गावठाणच्या जागेतून गत महिनाभरापासून वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ फेब्रुवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित महसूल विभागाने पंचनामा केला. मात्र, गावठाणच्या जागेतून उत्खनन झाल्याच्या ठिकाणचा पंचनामा करण्याऐवजी इतर जागेचा पंचनामा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तुलंगा खुर्द परिसरातील गावठाणच्या जागेतून शेकडो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन केले आहे. उत्खनन गावातील एका राजकीय पुढाऱ्याने केल्याची चर्चा परिसरात आहे. गावठाणच्या जागेतून रात्रंदिवस वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरूच असते. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचे चित्र आहे. महसूलच्या वरिष्ठांचा तलाठ्यावर वचक नसल्याने तलाठी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे वाळूमाफिया रात्रंदिवस सर्रास वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक करीत आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागाने पंचनामा केला. मात्र, पंचनामा चुकीच्या ठिकाणी केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
-------------------
तुलंगा येथील एका व्यक्तीच्या शेतात पंचनामा केला असता, ३० ते ३५ फुटांचे तीन खड्डे खोदल्याचे आढळून आले. त्या व्यक्तीकडे वाळू काढण्याचा परवाना असून, परवाना तहसील कार्यालयात सादर करण्याचे सांगितले आहे. तसा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात येईल.
व्ही. पी. शेरेकर, मंडळ अधिकारी, सस्ती.