पातूर : तालुक्यातील चोंढी धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातील साखरखळी, राजगुरी व चारमोडी गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने या पुरात २० ते २५ गुरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढल्याने चोंढी, आंधारसांगवी, चारमोळी गावाचा संपर्क तुटला होता. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यात गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. शनिवारी चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने परिसरातील नद्यांना पूर आला होता. मुंगळा गावाकडून येणारी साखर खडी नदी आणि काळाकामठाकडून येणारी राजगुरी नदी यांचा संगम अंधारसांगवी गावानजीक होतो. पुराचा स्तर वाढल्याने शेतशिवारात पाणी शिरले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतातून गुरे घरी येत असताना आंधारसांगवीनजीक असलेल्या पुलावरून काही गुरे पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच काही गुरे नदीकाठावरून परत आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. चोंढी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या. परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
--------------------
पावसाळ्यात नेहमीच्या परिसरात नद्यांना पूर येतो. नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटतो. मात्र, सध्यातरी कोणतीही गंभीर बाब नसल्याची माहिती आहे. तलाठ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. उद्या पाहणी केल्यानंतर नुकसान समजणार.
- दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.
-----------------------
खानापूर येथे गावात शिरले पाणी
गावच्या दक्षिणेकडून येणारा बोमटधरा आणि लिंगधरा नाल्याला पूर आल्याने तालुक्यातील खानापूर गावात नदीचे पाणी शिरल्याची माहिती आहे. गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू होताच गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
------------------------
१०० एकरांवरील पिकांचे नुकसान
चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने चोंढी, आंधारसांगवी, चारमोळी शिवारातील तब्बल १०० एकरांवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
-----------------
निर्गुणा नदीला मोठा पूर
खेट्री : निर्गुणा नदीला मोठा पूर आल्याने चोंढी, आलेगाव, चरणगाव, वीवरा, आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने कपाशी, सोयाबीन, आदी पिके जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
---------------
वाडेगाव येथेही सतर्कतेचा इशारा
परिसरात गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने वाडेगाव येथील नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या सुमारास गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.