पाणी ही शरीराची अत्यावश्यक गरज असून, पाण्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे शरीराला जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी प्रत्येक नागरिकाने पिणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास जसे शरीराचे नुकसान होते ; तसेच जास्तीचे पाणी पिणे सुद्धा आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डी-हायड्रेशनचा धोका वाढतो तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो.
कोणी किती पाणी प्यावे
वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)
० ते ६ महिने : आवश्यकता नाही
६ महिने ते १ वर्षे : २५० मिली लिटर
१ ते ३ वर्ष : १ लिटर
४ ते ८ वर्षे : १.२ लिटर
९ ते १३ वर्षे : १.८ लिटर
१४ ते १८ वर्षे : २.५ लिटर
१८ वर्षांवरील : ३ लिटर
......................
शरीराला पाणी कमी पडले तर ...
शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले तर डोके दुखणे, चक्कर येणे, डि-हायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात.
शरीरात पाणी जास्त झाले तर...
साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. ओव्हर-हायड्रेशनचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो.
तज्ज्ञ काय म्हणतात
शरीराला गरज भासते तेव्हा मेंदू तहान लागल्याचा संदेश पाठवतो. नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. अती पाणी पिणे ही समस्या मानसिक रुग्ण, मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांमध्ये जाणवते. पाण्याचे जास्त प्राशन केल्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो, असे मूत्रविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
निरोगी शरीरासाठी दिवसातून अडीच ते साडेतीन लिटर दरम्यान पाणी पुरेसे आहे. आवश्यकतेनुसार पाणी प्यायल्याने कोणतीच समस्या उद्भवत नाही. गरजेपेक्षा जास्त पाणी प्राशन केले तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.