अकोला : बाळापूर उप विभागाच्या रिक्त असलेल्या उप अभियंता पदाचा प्रभार अकोल्याचे उप अभियंता श्रीकांत जोशी यांच्याकडे देण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. त्याची अवहेलना करत, त्या पदावर रुजू होणार नाही, असे जोशी यांनी कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांना सांगितले. त्यामुळे प्रभाराचा प्रस्ताव फेरसादर करण्याची वेळ आली. मात्र, त्याचवेळी प्रभार घेण्यास नकार दिला नाही, अडचणीबाबत अर्ज दिला, असे जोशी यांनीच सभेत सांगितल्याने कार्यकारी अभियंता पाटील भरसभेत तोंडावर पडले.स्थायी समितीच्या सभेत सदस्य विजय लव्हाळे यांनी बाळापूर उप विभाग उप अभियंत्याचे पद गेल्या १२ दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे कामे अडली आहेत, असे सांगितले. या काळात हा प्रभार कोणाला दिला, अशी विचारणा केली. त्यावर कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी अकोल्याचे उप अभियंता श्रीकांत जोशी यांच्याकडे प्रभार देण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी दिला. त्यावर प्रभार घेणार नसल्याचे जोशी यांनी आपल्याला सांगितले. सीईओंच्या आदेशाची अवहेलना उप अभियंता जोशी यांनी कशी केली, हा मुद्दा लव्हाळे यांनी लावून धरला. त्यांना खुलासा करणे भाग पडले. कार्यकारी अभियंता पाटील यांना प्रभार घेणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले. हा प्रकार मनमानीसोबतच वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणारा आहे, त्यावर प्रशासन काय करणार, असेही लव्हाळे यांनी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांना विचारले. जोशी यांनी केलेल्या खुलाशात प्रभार घेण्यास नकार दिला नाही, वैयक्तिक अडचण असल्याबाबतचा अर्ज दिल्याचे सांगितले. जोशींच्या या पवित्र्याने कार्यकारी अभियंता पाटील तोंडावर पडले. त्यामुळे प्रभार न घेतल्याने जोशी यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.पशू संवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेतील दुधाळ जनावरे वाटपाच्या यादीत सदस्यांनी शिफारस केलेले कोणतेच नाव नसते. सातत्याने सांगूनही संबंधित अधिकारी-कर्मचारी दिलेली नावे डावलतात, असा आरोप दामोदर जगताप, लव्हाळे, लांडे यांनी केला.
सभागृहाला लागली गळतीविशेष म्हणजे, स्थायी समिती सभा सुरू असताना पावसामुळे सभागृहात अनेक ठिकाणी गळती लागली. त्यामुळे सदस्य, अधिकाºयांना खुर्च्या सोडून इतरत्र जावे लागले. हा प्रकार सदस्य जगताप, लव्हाळे यांनी उप विभाग अभियंत्यांच्या निदर्शनास आणला.