अकोला : गांधीग्राम पुलाच्या बांधकामासाठी तेथीलच नदीतील रेतीचे अवैध उत्खनन करून, वापर केल्याने नागपूर येथील कंत्राटदार मेर्सस चाफेकर अँन्ड कंपनीसह अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास ३ कोटी २६ लाख १८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतचा आदेश अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी २४ फेब्रुवारी रोजी दिला.अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथे पूर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम नागपूर येथील मेसर्स चाफेकर अँन्ड कंपनीमार्फत सुरू आहे. पुलाच्या बांधकामात गौण खनिजाच्या वापरासंदर्भात अकोला तहसीलदार आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी व लेखाधिकार्यांच्या पथकामार्फत गत पंधरा दिवसापूर्वी तपासणी करण्यात आली. गांधीग्राम येथील पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदार मे.चाफेकर अँन्ड कंपनीमार्फत गांधीग्राम येथीलच नदीतील २ हजार १८३ ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून, वापर केल्याचे या तपासणीत आढळून आले. पुलाच्या बांधकामासाठी रेतीचे उत्खनन आणि वापरासंबंधी पावत्यांची तपासणी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची असताना, कंत्राटदाराकडून करण्यात आलेले रेतीचे उत्खनन व वापराबाबत पावत्यांची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आली नसल्याचेही तपासणीत आढळून आले. त्यामुळे विनापरवाना २ हजार १८३ ब्रास रेतीचे अवैध उत्खनन आणि वापर केल्याने, कंत्राटदार नागपूर येथील मे. चाफेकर अँन्ड कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.सरोते, उपअभियंता एन.व्ही. खरे आणि सहायक अभियंता सागर तायडे यांना ३ कोटी २६ लाख १८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांनी २४ फेब्रुवारी रोजी पारित केला. आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा भरणा तातडीने शासकीय खजिन्यात करण्याचा आदेशही तहसीलदारांनी संबंधितांना दिला. गांधीग्राम येथील पुलाच्या बांधकामात रेतीचे अवैध उत्खनन करून वापर केल्याने, शासनाचा महसूल बुडविण्यात आला. त्यामुळे याबाबत कंत्राटदार नागपूर येथील मेर्सस चाफेकर अँन्ड कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास ३ कोटी २६ लाख १८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याच्या वृत्तास जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांनी दुजोरा दिला.६५ लाख ४९ रुपयांच्या रेतीची चोरी; शासनाला चुना!गांधीग्राम येथील पुलाचे बांधकाम करणार्या नागपूर येथील मेसर्स चाफेकरअँन्ड कंपनी या कंत्राटदाराकडून पुलाच्या बांधकामासाठी गांधीग्राम येथीलच नदीतील विनापरवाना २ हजार १८३ ब्रास रेतीचे उत्खनन करून वापर केला. बाजार दरानुसार ३ हजार रुपये प्रतिब्रासप्रमाणे संबंधित कंत्राटाराकडून ६५ लाख ४९ हजार रुपयांच्या रेतीची चोरी करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या महसुलास चुना लावण्यात आल्याने, या रकमेच्या पाचपट ३ कोटी २६ लाख १८ हजार रुपयांचा दंड संबंधितांना आकारण्यात आला.कार्यकारी अभियंत्यांची हलगर्जी; पावत्या न पाहताच देयक मंजूर!पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून करण्यात आलेले रेतीचे उत्खनन व वापरासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पावत्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु, गांधीग्राम येथील पुलाच्या बांधकामासाठी रेतीचे उत्खनन व वापराबाबत पावत्या न पाहताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यात आले व ते अदा करण्यात आले.कार्यकारी अभियंत्यांच्या हलगर्जीमुळे शासनाच्या महसुलास चुना लागला आहे.
कंत्राटदारासह कार्यकारी अभियंत्यास साडेतीन कोटींचा दंड!
By admin | Published: March 01, 2016 1:36 AM