अकोला : शहरातील मालमत्ताधारकांनी थकीत व चालू वर्षातील कराचा भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षातील सामान्य करातून सूट देण्याचा निर्णय गुरुवारी महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने घेतला. या निर्णयामुळे अकोलेकरांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
अकोलेकरांकडे एक-दोन नव्हे तर तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ व्हावी, या उद्देशातून मालमत्ता कर वसुली विभागाच्या स्तरावर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले जात आहेत. आज रोजी नागरिकांना थकीत व चालू वर्षाची मालमत्ता कराच्या देयक वितरणाचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी थकीत चालू वर्षातील कराचा भरणा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
तसेच चालू वर्षातील कराचा भरणा १३ जून पूर्वी केल्यास संबंधित मालमत्ताधारकास सामान्य करामध्ये तब्बल ७ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १३ जुलैपूर्वी चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यांना ६ टक्के सूट देण्यात येणार आहे. १२ ऑगस्टपूर्वी कराचा भरणा केल्यास ५ टक्के सूट देण्यात येईल. या योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक विजय पारतवार यांनी केली आहे.
ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा
ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराचे मागणी देयक प्राप्त झाले नसतील त्यांना संबंधित झोन कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच मनपाच्या वेबसाइटद्वारे नागरिकांना ऑनलाइन कराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.