अकोला : जिल्ह्यातील ६४ खेडी व ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये गत आठ दिवसांत दोन पाणीपुरवठा योजनेंतर्गत १३ लाख ८० हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टीची रक्कम मोठ्या प्रमाणात थकीत असून, पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचे वीज देयक, पाणी आरक्षणाचे देयक व देखभाल दुरुस्तीचा खर्च जिल्हा परिषद सेस फंडातून भागविण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत संबंधित ग्रामपंचायतींकडून थकीत पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यासाठी पथके गठित करून पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी अकोला व अकोट पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना १९ एप्रिल रोजी दिला होता. त्यानुसार दोन्ही पंचायत समितीमार्फत ८४ खेडी व ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गठित करण्यात आलेल्या पथकांमार्फत गावागावांत जाऊन थकीत पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यामध्ये गत आठ दिवसांच्या कालावधीत २८ एप्रिलपर्यंत दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत १३ लाख ८० हजार रुपये पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यात आली. त्यामध्ये ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ७ लाख १७ हजार रुपये व ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६ लाख ६३ हजार रुपये पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यात आली आहे.