- सदानंद सिरसाट अकोला: जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी गट, गणांचे आरक्षण ठरविल्यानंतर जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी, सदस्यांचा हिरमोड झाला होता. प्रशासनाने ठरविलेले आरक्षणच आता बदलणार आहे. त्यातच नवे आरक्षण अस्तित्वात येईपर्यंत विद्यमान सदस्यांनाच संधी असल्याने अनेकांच्या जीवात जीव आला. नव्या बदलात काय होईल, ते वेळेवरच पाहू, या मानसिकतेत आता सदस्य आले आहेत.जिल्हा परिषदेची संपुष्टात येणारी मुदत पाहता निवडणूक विभागाने जुलैच्या सुरुवातीला प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया सुरू केली होती. त्या प्रक्रियेत अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि स्त्रियांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यावेळी अनेकांना धक्का बसला. काहींना त्यांच्या गावांचा समावेश असलेल्या गट, गणांतूनच विस्थापित होण्याची वेळ आली. त्यामुळे निवडणूक लढायचीच, असा निश्चय असलेल्यांनी सोयीचा मतदारसंघ हेरण्याची तयारीही केली. त्याचवेळी स्थानिकांची मनस्थिती, त्यांचा कल जाणून घेण्याचे प्रयत्नही अनेकांनी सुरू केले. त्यातच न्यायालयाच्या आदेशाने आरक्षणाची प्रक्रियाच ‘जैसे थे’ ठेवल्याने ज्यांना संधी होती, त्यांचा हिरमोड, तर ज्यांचा आधी हिरमोड झाला होता, त्यांना नव्या प्रक्रियेतून संधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र दरम्यानच्या काळात न्यायालयीन प्रकरणात शासनाला वेळकाढू धोरण अवलंबवावे लागले. त्याचा फायदा विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना झाला आहे. त्यामुळे ठरलेल्या आरक्षणाने विस्थापित होण्याची वेळ जिल्हा परिषदेतील ज्या विद्यमान सदस्यांवर आली, त्यांना आॅक्सिजन मिळाला, तर नव्याने समीकरण जुळविण्याची संधी मिळण्याची अपेक्षाही निर्माण झाली.
हिरमोड झालेल्यांच्या अपेक्षांना धुमारेस्थगित झालेल्या आरक्षण प्रक्रियेत ज्याचे गट आरक्षित झाले होते, त्यामध्ये प्रमुख दहा पदाधिकारी होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शरद गवई, माजी उपाध्यक्ष गुलाम नबी हुसेन देशमुख, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, माजी सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव व द्रोपदा वाहोकार या पदाधिकाºयांना मतदारसंघ शोधण्याची वेळ आली होती. त्याशिवाय, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, जिल्हा परिषदेतील सध्याचे भाजपचे गटनेते रमण जैन, गोपाल कोल्हे, सम्राट डोंगरदिवे, प्रतिभा अवचार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख ज्योत्स्ना चोरे, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनाही त्यांच्या गटातून धक्का बसला होता. आता ते सर्व निश्चिंत असून, नव्या प्रक्रियेपर्यंत संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.