अकाेला : जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एमपी बीअर बार फाेडून अज्ञात चोरट्यानी महागड्या ब्रँडची सुमारे दाेन लाख रुपयांची दारू पळविल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दारु चाेरट्यांची चार जणांची टाेळी रविवारी जेरबंद केली. त्यांच्याकडून दारुसह दाेन चाेऱ्यातील पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमपी बीअर व बार रेस्टॉरंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लाेखंड वाकवून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी गोदामाचे कुलूप फाेडून त्यातील महागड्या ब्रँडचे विदेशी दारूचे बॉक्स चोरी केले. २० बाॅक्समधील सुमारे दाेन लाख रुपयांची दारु या चाेरट्यांनी पळविली. बारचे मालक सिमांत तायडे दुपारी बार उघडण्यासाठी आले असता चाेरी झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पाेलिसांनी चाेरीचा गुन्हा दाखल केला. तसेच घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी पथकासह धाव घेऊन श्वान पथक, ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण केले. ही चाेरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पाेलिसांना तपास करण्यास मदत झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या चाेरीतील हसन ऊर्फ इम्मी छट्टु निमसुरवाले त्याचा साथीदार चांद तुकड्या चाैधरी दाेघेही रा. गवळीपूरा कारंजा यांना ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन अकील कासम गारवे रा. गवळीपुरा कारंज व जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील छट्टु पटेल या दाेघांना अटक केली. पाेलिसांनी चार जणांना अटक करून त्यांच्याकडून एमपी वाईन बारमधील मुद्देमाल तसेच एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चाेरीतील मुद्देमाल असा एकून पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमूख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सागर हटवार, सदाशीव सुडकर, माेहम्मद रफीक, अब्दुल माजीद, रवी इरच्छे, एजाज अहमद, राेशन पटले, अनिल राठाेड, अविनाश मावळे यांनी केली.