लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन बुधवारी होत आहे. कोरोना प्रतिबंधांच्या नियमांमुळे गर्दीचे कार्यक्रम घेता येणार नसले तरी अकोल्यात प्रत्यक्ष अयोध्याच अवतरली याची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील ३०० मंदिरांवर रोषणाई, १० लाख घरांवर दीप प्रज्वलन, चौकाचौकात भगव्या पताकांची आरास अन् रांगोळीच्या माध्यमातून श्रीराम मंदिराचे दर्शन असे नियोजन करण्यात आले आहे.श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या पुढाकाराने बुधवारी अकोल्यात दिवाळीचाच आनंद असेल, असे नियोजन करण्यात आले आहे.अकोला शहरातील राजेश्वर, मोठे राममंदिर, सालासार हनुमान मंदिर, रामदेव बाबा, श्याम बाबा मंदिर, राणीसतीधाम, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, संतोषी माता मंदिर, दुर्गामाता मंदिर, तपे हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर, बिर्ला राममंदिर, छोटे राममंदिर, जुन्या शहरातील राममंदिर, विठ्ठल मंदिर, माळीपुरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, हरिहरपेठ, उमरी, जठारपेठ, तापडिया नगर, रामदासपेठ, कौलखेड, खडकी, मलकापूर, डाबकी रोड या भागातील मंदिरात विद्युत रोषणाई व दिवे ४ व ५ आॅगस्ट रोजी लागणार आहेत.कोरोनाचे संकट लक्षात घेता चौकांमध्ये कुठलाही कार्यक्रम होणार नाही मात्र जिल्हाभरातील भाविकांनी घरीच राम नाम जप करावा, असे आवाहन श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व भाजपाच्या वतिने करण्यात आले आहे.
आज रांगोळीतून साकारणार राम मंदीराची प्रतिमारामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने खंडेलवाल भवन येथे ४ आॅगस्ट रोजी सिद्धहस्त रांगोळी कलाकार प्रवीण पवार यांच्या कलाकृतीतून अयोध्या येथील प्रस्तावित राममंदिर व रामलला यांची प्रतिमा साकारली जाणार आहे. तसेच हजारो दिवे लावण्यात येणार आहेत, ५ आॅगस्ट रोजी वेदपाठी ब्राह्मणांच्या पौराहित्यामध्ये मंत्रोपचाराने राम दरबार मूर्ती व श्रीराम जानकी पादुकांचे पूजन होणार आहे.राम मंदिर निर्माण आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणाºया राम भक्तांचा आनंदाचा हा क्षण आहे त्यामुळे हा आनंद २५ हजार भाविकांपर्यंत लाडू प्रसादाचे वितरण करून द्विगुणीत करणार असल्याची महिती रामनवमी समितीच्या वतीने देण्यात आली.