अकोला : उत्सवप्रिय आपल्या देशात नवरात्रौत्सवातील विविध रंग जनमानसात वेगवेगळे रंग भरुन मानवी जीवाला नव्या उत्साहात दंग करुन जातात. अशातच आकाशातही शनिवार २१ व रविवार २२ ऑक्टोबरला मृग नक्षत्रातून रंगीबेरंगी उल्कांची उधळण होणार आहे.
आकाशात क्षणार्धात चमकणारी प्रकाशरेखा जिला काही लोक तारा तुटला असे म्हणतात परंतु ती उल्का असते. आकाशात रोज रात्री वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात उल्का पडत असतात, पण पृथ्वी कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित असल्याने वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समूहातून उल्कांचा वर्षाव अनुभवता येतो. आपल्या सूर्य कुलाचेच घटक असलेले धुमकेतू सूर्य प्रदक्षिणा पूर्ण करतांना काही वस्तूकण भ्रमण मार्गावर सोडून जातात व पृथ्वी ज्यावेळी यांच्या जवळून जातांना असे वा इतर लहानमोठ्या वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जातात आणि वातावरणातील घर्षणामुळे पेट घेतात. याच विविधरंगी प्रकाशरेखा आपण नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात. २१ व रविवार २२ ऑक्टोबरला आकाश प्रेमींनी हा नजारा अनुभवावा असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
उल्का वर्षाव कधी, कोठे, कसा बघायचा?मध्यरात्री नंतर पूर्व आकाशात हा तारका समूह चार ठळक ताऱ्यांच्या चौकोनात एका सरळ रेषेत तीन तारे दिसतील व तीच काल्पनिक रेषा जरा पुढे वाढविल्यास एक तेजस्वी तारा दिसेल. तोच पृथ्वीवरुन दिसणारा सर्वात तेजस्वी तारा व्याध नावाचा आहे. झोपलेल्या अवस्थेत तोंड पूर्वेस करून सुमारे दरताशी वीस एवढ्या उल्का पडताना दिसतील. याच मृग नक्षत्रात जेव्हा सूर्य येतो तेव्हा आपल्या कृषिप्रधान देशात पावसाला सुरूवात होत असते.