अकोला : पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिलच्या युद्धात १८ हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी सहभाग नोंदवीत युद्ध जिंकले. या युद्धात हवाई दल योद्धा म्हणून प्रत्यक्ष लढलेल्या सुनील उपाध्ये यांनी ‘कारगिल’च्या आठवणींना उजाळा दिला. ३० ते ४० अंश उणे तापमानातही सैन्याच्या पोस्टवर त्यांनी युद्धाचा थरार अनुभवला. अत्यंत कठीण परिस्थितीत लढत जवानांनी दाखवलेले शौर्य आजही अंगावर रोमांच उभे करते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले हे सर्वसाधारण युद्ध नव्हते. पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याची माहिती मिळताच सर्वप्रथम भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानी घुसखोरांना प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. या युद्धात ज्याप्रमाणे हवाई दलाने महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्याचप्रमाणे भारतीय सैन्यानेसुद्धा बोफोर्स तोफांचा यशस्वी वापर करून पाकला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात ३० हजार भारतीय लढले. या युद्धात अकोल्याचे सुपुत्र सुनील उपाध्ये यांनीही सहभाग नोंदविला होता. यावेळी त्यांनी अनुभवलेले थरारक अनुभवही ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर सीमेवरील वातावरण कसे आहे, ही माहिती घेण्यासाठी ते ॲडव्हान्स लॅन्डिंग पोस्टवर त्यांच्या टीमसोबत गेले होते. यावेळी काही सैनिक त्यांच्या सोबत होेते. त्यांनी दिलेल्या हवामानाच्या माहितीनुसार सैन्याची पुढील दिशा ठरत असे. युद्ध सुरू असताना सतत डागले जाणारे रॉकेट, बंदुकांचा अनुभवही त्यांना आला. कारगिल युद्धात सहभाग नोंदवून केलेली कामगिरी आजही ते अभिमानाने सांगतात.
देश रक्षणाचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी तरुणांनी व पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवण्याची गरज आहे. तसेच जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी.
- सुनील उपाध्ये, माजी सैनिक
विजयस्टार पदकाने सन्मान
युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदविणाऱ्या सुनील उपाध्ये यांना विजयस्टार पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ते सध्या महावितरणच्या अमरावती मंडळात उपविधी अधिकारी म्हणून अकोला येथे कार्यरत आहेत.