लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षकांच्या विशेष संवर्ग भाग एकमध्ये जिल्हांतर्गत बदल्यांची माहिती आॅनलाइन अपलोड करण्यासाठीची सुविधा शुक्रवारी दुपारी ४ वाजता बंद केली जात आहे. या वेळापत्रकानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना १३ जुलै रोजी देण्यात आले. शिक्षकांच्या बदल्यांसाठी तयार केलेल्या नवीन पद्धतीची वेबसाइट पहिल्याच दिवसापासून खंडित रूपात चालू होती. त्यामुळे विशेष संवर्गाच्या याद्यांची माहिती अपलोड करणे गटशिक्षणाधिकाऱ्यांना शक्य झाले नाही. त्यानंतर शासनाच्या नव्या धोरणानुसार, बदलीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार विशेष संवर्ग भाग एकमध्ये नमूद शिक्षकांचे अर्ज आणि आॅनलाइन माहिती भरण्यासाठी १७ ते २९ जूनचा कालावधी ठरवून देण्यात आला. त्याला मुदतवाढ देत १४ जुलैपर्यंत शिक्षकांना संधी देण्यात आली. या प्रक्रियेत जिल्हांतर्गत बदलीसाठी मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज दाखल करावयाचे आहेत, तसेच ती माहिती पोर्टलवर भरण्याचे निर्देश आहेत. ही माहिती अचूक करण्यासाठीची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. केवळ नोंदी अद्ययावत नाहीत म्हणून कोणत्याही उमेदवारास अर्ज करण्यास अडचण येणार नाही, याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेण्याचेही उपसचिव गिरीश भालेराव यांनी पत्रात म्हटले आहे.
बदल्यांची आॅनलाइन माहितीची मुदत संपुष्टात
By admin | Published: July 14, 2017 1:27 AM