अकोला: वर्धा जिल्ह्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने सिव्हिल लाइन्स परिसरात रहिवासी असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उजेडात आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दीपक निंबाळकर नामक पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक दीपक शालीग्राम निंबाळकर (३७) याचा आधीच विवाह झालेला असताना तसेच त्याला एक मुलगा असताना त्याने अकोल्यातील जठारपेठ परिसरातील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दिले. अविवाहित असल्याचे सांगून तिच्यावर प्रेम असल्याची बतावणी केली. प्रेमसंबधातच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याचे वारंवार आश्वासन या पीएसआयने तीला दिले. लग्नाचे आमिष दिल्यानंतर पीएसआयने २७ वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण केले. सप्टेंबर २०१७ पासून हा पोलीस उपनिरीक्षक या युवतीचे लैंगिक शोषण करीत असल्याचे तक्रारीत नमूद असून, त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पीएसआय दीपक निंबाळकर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ४१७ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीदेखील एका पीसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही पोलीस कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत असल्याने अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी कठारे कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गुडधी, नाशिक व शेगावात केले शोषण
जठारपेठ परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेचा घटस्फोट झाल्याची माहिती आहे. या युवतीचे लग्न झाल्यानंतर २००८ मध्ये तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर याने तिच्या मोबाइलवर संपर्क साधून मैत्री केली. तिचा वाढदिवस असताना गुडधी परिसरातील एका निर्जन स्थळी नेऊन कारमध्ये जबरी संभोग केला होता. त्यानंतर नाशिक येथे त्याचे प्रशिक्षण सुरू असतानाही महिलेला हॉटेलवर ठेवून बलात्कार केला. महिलेने लग्नाची मागणी केली असता, त्याने विरोध केल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सिव्हिल लाइन्स पोलिसांची टाळाटाळसिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. यापूर्वीदेखील चोरी , महिला व युवतींच्या छेडखानी प्रकरणात सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचे वास्तव आहे; मात्र महिलेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.