आकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गाजीपूर शेतशिवारातील गिट्टी खदानीवरून २४ मे रोजी महसूल विभागाने स्फोटक पदार्थ जप्त केले. हे साहित्य संरक्षित स्फोटक स्टोअररुममध्ये ठेवण्याकरिता पोलीसांच्या स्वाधीन करण्यात करण्यात आले असून याबाबत नोंद घेण्यात आली असल्याची माहिती आकोट ग्रामीण पोलीसांनी दिली. गाजीपूर येथील महेंद्र जगदीशप्रसाद तरडेजा यांच्या मालकीच्या शेत सर्व्हे नं.३६ मधील गिट्टी, मुरुम, दगड खदानीची तपासणी मंडळ अधिकारी सुरेश गवई व त्यांच्या पथकाने २४ मे रोजी केली. यावेळी खदानीमध्ये एक जीवंत स्फोटक पदार्थाची कांडी आढळून आली. दोन पंचांच्या समक्ष सदर स्फोटक पदार्थ जप्त करुन पंचनामा करण्यात आला. तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला पत्र देऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जप्त केलेले स्फोटक पदार्थ पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे. याबाबत खदान मालक महेंद्र तरडेजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अशाप्रकारे स्फोट घडविल्या जातात गिट्टी खदान ही सोन्याची खाण समजल्या जाते. कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार असलेला व्यवसाय सध्या तेजीत आहे. महसूल विभागाची परवानगी घेतल्यानंतर खदानींमधून उत्खनन करण्यात येते. खदानीमधील गिट्टीचा दर्जा पाहता मनुष्य बळाऐवजी अवैधपणे गिट्टी खदानीत स्फोट घडविले जातात. या स्फोटांमुळे वन्यप्राण्यांसह परिसरात काम करणार्या मजुरांना सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो.मात्र तरीही स्फोट घडविण्यात येतात. याकडे पोलीस, महसुल व वनविभागाच्या काही अधिकारी-कर्मचार्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांमधून होतो. स्फोट घडविण्यापूर्वी खदानीमध्ये होल पाडण्यात येतात. त्यानंतर त्यामध्ये बारुद भरुन वायरींग करुन चार्ज करण्यात येते. त्यानंतर मुख्य बॉक्सव्दारे स्फोट घडविण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज महसुल विभागाने व्यक्त केला आहे.
गिट्टी खदानीतून स्फोटके जप्त
By admin | Published: May 25, 2016 2:13 AM