नगराेत्थान याेजनेतून हाेतील विकासकामे
अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेअंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाने ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा केला आहे. दरम्यान, विकासकामांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले हाेते. लवकरच या याेजनेतून शहरातील विकासकामांना प्रारंभ केला जाणार आहे.
सांडपाण्यामुळे साथराेगांत वाढ
अकाेला : शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा हाेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांमध्ये साथराेग पसरल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. घाण, अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली असून साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.
मच्छी मार्केटमध्ये अस्वच्छता
अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरातील मच्छी मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून मांसाचे तुकडे उघड्यावर फेकले जातात. या ठिकाणी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नियमित साफसफाई हाेत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी वैतागले आहेत. यासंदर्भात उत्तर झाेन कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे.
स्वच्छतेला खाे; नाले, गटारे तुंबली
अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे कवडीचेही नियंत्रण नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने शहरात सर्वत्र नाले, गटारे तुंबली आहेत.
टायमर बिघडले; पथदिवे बंद
अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. प्रमुख मार्गांवरील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. गांधी राेड, लाेखंडी पूल, हरिहरपेठ ते वाशिम बायपास चाैक आदी भागात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मनपाचा विद्युत विभाग व संबंधित कंत्राटदार झाेपेत आहे का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.
साेशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
अकाेला : शहरात मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्णसंख्येत लक्षणीय घसरण झाल्याचे समाेर आले आहे. परंतु अद्यापही काेराेनाची लाट लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसे न करता नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असून यादरम्यान साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे. ताेंडाला रुमाल किंवा मास्क न लावता नागरिक खुलेआम फिरत आहेत.