अकोला : यंदा पदवी अभ्यासक्रमाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जवळपास सर्वच जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश न मिळाल्याने अमरावती विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जागाच शिल्लक नसल्याने प्रवेश मिळणार कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात काही परीक्षा ऑनलाईन, तर काही परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर पार पडल्या. या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले. गत वर्षीपर्यंत हा निकाल ७० ते ७५ टक्क्यांवर होता. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळायचा. परंतु, यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश दिलेल्या मुदतीतच पूर्ण झाले. अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने अमरावती विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. महाविद्यालयांकडे प्रवेश देण्यासाठी जागाच शिल्लक नसताना दिलेल्या मुदतवाढीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथ हेल्ड’मध्ये
अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथ हेल्ड’मध्ये असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांनाही निकालाची प्रतीक्षा आहे. यातील जे विद्यार्थी उत्तीर्ण हाेतील, त्यांना प्रवेशासाठी जागाच उपलब्ध नसतील. त्यामुळे महाविद्यालयांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
महाविद्यालयस्तरावर १० टक्के जागांमध्ये वाढ
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागाच शिल्लक नसल्याने महाविद्यालय स्तरावर १० टक्के जागा वाढविण्यात आल्याची माहिती महाविद्यालयांनी दिली, परंतु, या जागादेखील मर्यादीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाविनाच राहावे लागण्याची शक्यता आहे.
यंदा निकाल जास्त लागल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जागांची अडचण निर्माण झाली आहे. प्रामुख्याने विज्ञान शाखेत मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्रीसाठी यांसारख्या विषयांना विद्यार्थ्यांची जास्त पसंती असून, त्यांना प्रवेेश मिळणे कठीण झाले आहे.
- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, अकोला