अकोला: जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळीगट व शिलाई मशीन वाटप योजनेसाठी लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्यासाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंगळवारी घेण्यात आला.जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील लाभार्थींना शेळीगट व शिलाई मशीन वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थींकडून अर्ज स्वीकृतीची मुदत संपुष्टात आली आहे. त्यानुषंगाने लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे समितीच्या सभेत ठरविण्यात आले. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या विषयांवरही सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या सभेला सदस्य बाळकृष्ण बोंद्रे, निकिता रेड्डी, सविता अढाऊ, पद्मा भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.दलित वस्ती कामांच्या आराखड्याला देणार मंजुरी!दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत सन २०१७-१८ ते २०२३ या पाच वर्षातील जिल्ह्यातील दलित वस्ती कामांचा बृहद आराखडा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत अमरावती येथील समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्तांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर, जिल्ह्यातील दलित वस्ती कामांच्या आराखड्याला मंजुरी देण्याचे समाजकल्याण समितीच्या सभेत ठरविण्यात आले.