अकोला : आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे-अमरावती द्विसाप्ताहिक व लोकमान्य टिळक टर्मिनन्स-बल्लारशाह साप्ताहिक विशेष गाड्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या अकोला मार्गे जाणाऱ्या असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. दोन्ही गाड्यांच्या वेळ व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २९ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष आता १ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष आता २ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या अप १४ व डाऊन १४ अशा एकूण २८ फेऱ्या होणार आहेत.
यासोबतच २६ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष ३ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. २७ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०११२८ बल्हारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या अप ७ व डाऊन ७ अशा एकूण १४ फेऱ्या होणार आहेत.
ओखा-मदुरै एक्स्प्रेसच्या आणखी २६ फेऱ्यादक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या ओखा-मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ व २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दर सोमवारी रवाना होणाऱ्या ०९५२० ओखा-मदुरै एक्स्प्रेसच्या २ ऑक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधित १३ फेऱ्या होणार आहेत. तर दर शुक्रवारी रवाना होणाऱ्या ०९५१९ मदुरै-ओखा एक्स्प्रेसच्या ६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधित १३ फेऱ्या होणार आहेत. या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.