अतुल जयस्वाल, अकोला : आगामी सण-उत्सव व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने हैदराबाद-जयपूर व तिरुपती-अकोला या दोन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाड्यांना जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.दक्षिण मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ५ एप्रिल २०२४ ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे.
ही गाडी दर शनिवारी सकाळी ५:४० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीच्या १३ फेऱ्या होणार आहेत. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७११६ जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी ७ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत दर रविवारी प्रस्थान स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दर सोमवारी दुपारी ३:१० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीच्या १३ फेऱ्या होणार आहेत.
तिरुपती-अकोला-तिरुपती विशेषच्या २६ फेऱ्या
०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ एप्रिल २०२४ ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर १२:१५ वाजता येणार आहे. ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ७ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण २६ फेऱ्या होणार आहेत.