नगराेत्थान याेजनेंतर्गत ४.५० काेटी प्राप्त
अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेअंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागणार असून, एकूण ५ काेटी ८५ लाख रुपयांतून प्रस्तावित कामे निकाली काढल्या जाणार आहेत. तसे प्रस्ताव नगरसेवकांकडून मागितले आहेत.
दलित वस्ती याेजना; निधी मंजूर
अकाेला : महापालिका प्रशासनाला दलित वस्ती सुधार याेजनेअंतर्गत साडेचार काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्राप्त निधीतून नाली, रस्ते, पथदिवे आदी विकासकामे केली जातील. त्यासाठी नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल.
थंडीचा कडाका; आजारांत वाढ
अकाेला : शहरात थंडीचा कडाका वाढला असून, यामुळे लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांमध्ये सर्दी, खाेकला व तापाचे प्रमाण वाढले आहे. आजारांत वाढ झाल्याने खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. घाण, अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली असून, साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.
रस्त्यांची झाडपूस नाही; वाहनधारक त्रस्त
अकाेला : शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर साफसफाई केली जात असल्याचे चित्र आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावल्या जात असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
मच्छी मार्केटमध्ये स्वच्छता
अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरातील मच्छी मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून मांसाचे तुकडे उघड्यावर फेकल्या जातात. मनपाच्या सफाइ कर्मचाऱ्यांकडून याठिकाणी नियमीत साफसफाई हाेत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, दुर्गंधी पसरली आहे.
स्वच्छतेला खाे; नाले, गटारे तुंबली
अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाई कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने नाले, गटारे तुंबल्याचे दिसून येत आहे.
टायमर बिघडले; पथदिवे बंद
अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलइडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. हद्दवाढ क्षेत्रातील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. याप्रकाराकडे मनपाच्या विद्यूत विभागासह कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
अकाेला : शहरात मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची लाट लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसे न करता नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे.
भाविकांची गर्दी; नियमांचा विसर
अकाेला : काेराेना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने दिवाळीपर्यंत धार्मिक स्थळे बंद ठेवली हाेती. त्यानंतर धार्मिक स्थळे उघडण्यात आली. शहरातील विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविक गर्दी करीत असून, यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांवरील गतिराेधक हटवा !
अकाेला : शहरातील मुख्य रस्ते तसेच प्रभागांमधील गल्लीबाेळात जागाेजागी गतिराेधक बसविण्यात आले आहेत. नागरिक स्वखर्चातून घरासमाेर गतिराेधक उभारत आहेत. यामुळे वाहनचालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, मनपाने तातडीने अनावश्यक गतिराेधक हटविण्याची मागणी हाेत आहे.