अकोला: पाणी पुरवठा विभागात विविध कंत्राटाचा करार संपुष्टात आल्यानंतरही त्या कंत्राटदारांनाच काम करून मलिदा लाटण्याची संधी देण्यासाठी सातत्याने मुदतवाढ देण्याचा प्रकार घडत आहे. ब्लिचिंग पावडर पुरवठादारासोबतच भाडेतत्त्वावरील वाहन पुरवठादाराला गेल्या वर्षभरापासून मुदतवाढ देण्यात आली. त्याचवेळी मे २०१७ मध्ये सुरू केलेली निविदा प्रक्रिया अद्यापही अंतिम झाली नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आधी दोनदा अपात्र झाल्यानंतर तिसऱ्यांदा निविदेत पात्र ठरलेल्या कंत्राटदारावर पाणी पुरवठा विभागाची चांगलीच मेहरबानी असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात प्रतिमहिना १ लाख ५० हजारांपेक्षाही अधिक रुपये भाडे खर्चातून सहा वाहने भाडेतत्त्वावर सुरू आहेत. त्यासाठी १ जुलै २०१६ रोजी निविदेतून पात्र ठरलेल्या आशुतोष ट्रॅव्हल्ससोबत ३१ जुलै २०१७ पर्यंत वाहन पुरवठ्याचा करारनामा करण्यात आला. तो संपुष्टात येण्याला १५ महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही त्याच पुरवठादाराला मुदतवाढ देण्याचा अट्टहास पाणी पुरवठा विभागाने केला आहे. विशेष म्हणजे, आधीच्या कंत्राटदाराची मुदत संपण्यापूर्वीच निविदा प्रक्रियेतून अंतिम निवड झालेल्या कंत्राटदाराला पुरवठा आदेश देण्याचा प्रघात या विभागाने मोडीत काढला आहे. त्यातून आधीच्या कंत्राटदाराला मलिदा लाटण्याची संधी देण्यासाठी विभागाचे अधिकारी-कर्मचारी चांगलेच सकारात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे.- निविदा काढण्यास मुद्दामच विलंब!वाहन पुरवठादार आशुतोष ट्रॅव्हल्सची मुदत ३१ जुलै २०१७ रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वी नव्या पुरवठादारासाठी निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना पाणी पुरवठा विभागाने निविदा प्रक्रियेला १६ सप्टेंबर २०१७ रोजी सुरुवात केली. हा विलंब पाहता विभागातील अधिकारी-कर्मचारी पुरवठादाराला मुदतवाढीत जास्त कालावधी मिळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते.- वाहन निविदेतही साखळी (कार्टेलिंग) पद्धतविशेष म्हणजे, प्रथम निविदा प्रक्रियेत सहभागी आशुतोष, भवानी, रत्नम ट्रॅव्हल्सपैकी रत्नम अपात्र ठरली. दुसºयांदा दोनच पुरवठाधारकांनी सहभाग घेतला. तिसºयांदा आलेल्यापैकी आशुतोष, भवानी, रत्नम यांचे दरपत्रक उघडण्यात आले. त्यामध्ये आशुतोष ट्रॅव्हल्स पात्र ठरले आहे. त्यापैकी आशुतोषच्या दराची तुलना केल्यास भवानीचा दर शंभर टक्के, तर रत्नमचा दर १५० टक्के अधिक आहे. या दराकडे पाहता आशुतोष ट्रॅव्हल्सला पात्र करण्यासाठी इतर दोघांना सहभागी केल्याची चर्चा आहे. ही साखळी पद्धत पारदर्शक निविदा प्रक्रियेला धाब्यावर बसविणारी आहे.- आशुतोष, भवानी एकच पुरवठादारनिविदा प्रक्रियेत इतर दोघांना सहभागी केल्याशिवाय निविदा उघडली जात नाही. त्यासाठी कंत्राटदार, पुरवठादारांनी साखळी करून दोन साथीदार तयारच करून ठेवल्याची अनेक उदाहरणे निविदेची तांत्रिक चौकशी केल्यास उघड होऊ शकतात. आशुतोष ट्रॅव्हल्स, भवानी ट्रॅव्हल्स या दोन पुरवठादारांनी निविदा भरताना पात्रतेसाठी सादर केलेल्या वाहनांच्या यादीत एकाच वाहनाचा क्रमांक समाविष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांचा मालक एकच व्यक्ती किंवा दोघांनी मिळून निविदा भरली. वाहन क्रमांक एमएच-३० एए-७५५३ हे एकच वाहन दोघांच्या पात्रतेसाठी कसे मान्य झाले, ही बाब शोधाची आहे.