अकोला : रुग्णसेवा हेच खरे व्रत मानून आपले संपूर्ण आयुष्य या कार्यात घालविणाऱ्या परिचारिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच असून, रुग्णसेवा व कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांची ससेहोलपट होत आहे. बदलत्या काळात सरकारी रुग्णालयांचा विस्तार होत आहे, खाटांची संख्या वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात परिचारिकांची पदे भरली जात नाही व नवीन पदे निर्माण केली जात नाहीत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण परिचारिकांवर वाढत असल्याचे वास्तव जागतिक परिचारिका दिनाच्या पृष्टभूमीवर समोर आले आहे.फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी क्रिमियन युद्धाच्या काळात जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा करून संपूर्ण जगाला त्यांनी रुग्णसेवेचा नवीन आदर्श निर्माण करून दिला. १२ मे १८२० मध्ये जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली आणि संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी खर्ची घातले. त्यांच्या कार्यानिमित्त त्यांच्या जन्मदिवस १२ मे हा ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. आजही रुग्णांच्या दु:खावर मायेची फुंकर घालून स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी परिचारिकांची धडपड सुरू असते. परंतु, त्यांच्या कार्याकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. परिचारिकांच्या समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत. एकीकडे कामाचे वाढणारे तास, रुग्णांची सेवा करताना येणारा मानसिक ताण, असुरक्षितता, तर दुसरीकडे स्वत:च्या कौटुंबिक जबाबदाºया, अशा दुहेरी कसरतीच्या ओझ्याखाली परिचारिका जीवन व्यतीत करीत आहेत. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, इतर कर्मचारी कधी-कधी रुग्ण व त्यांचे नातेवाइकांकडूनही शारीरिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. परिचारिकांच्या प्रशासनाकडून होणाऱ्या बदल्यांमुळे परिचारिकांना कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण, माता बाल संगोपन, विविध प्रकारचे सर्व्हे यासारख्या कामांचा बोजा टाकला जातो. कामाच्या ठिकाणी परिचारिकांना रात्रपाळी, दिवसपाळी करावी लागते, अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा येथे उपस्थित होतो.परिचारिकांना दुय्यम स्थानआरोग्य सेवेत परिचारिका यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असली, तरी त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. आरोग्य सेवेच्या कणा असलेल्या परिचारिकांच्या मागण्यांकडे शासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.परिचारिका व्यवसायाला आपल्या देशात प्रतिष्ठा आहे. ती जपणे परिचारिकांचे कर्तव्यच आहे. तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके ठेवून रडू शकत नाही आणि आनंदात स्वत:ला मिठीही मारू शकत नाही. आयुष्य म्हणजे दुसऱ्यांसाठी जगण्याची बाब आहे, हे परिचारिकांकडून शिकावे.- वैशाली वल्लमवार, अधिपरिचारिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला