लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे (अकोला): पूर्णा नदीपात्रातून लिलाव न झालेल्या घाटातील रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणार्या चार ट्रॅक्टर मालकांना शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी १२ फेब्रुवारी रोजी दिले. २६ जानेवारी रोजी पहाटे वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. हे ट्रॅक्टर लिलाव न झालेल्या हाता येथील पूर्णा नदीपात्रातून मागील आठ दिवसांपासून रात्री १0 वाजताच्या नंतर दररोज वाळूची चोरी करीत असल्याची माहिती हाता सरपंच दामोदर यांनी बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांना दिली होती. तहसीलदार पुंडे यांनी मंडळ अधिकारी ए. एम. मेश्राम, तलाठी डी. एस. काळे, सतीश कराड, कोतवाल राजीव डाबेराव यांचे पथक नेमून लिलाव न झालेल्या घाटावर गस्त घालण्याचे आदेश दिले होते. या पथकाला चोरीची रेती वाहतूक करताना एमएच २८ बी २२१७, एमएच ३0 जे ४0७१, एमएच ३0 एबी ५७१७, एमएच ३0 एबी ६५३३ हे चार ट्रॅक्टर आढळले होते. या चार ट्रॅक्टरधारक कौसकार, गावंडे, कुचके व दामोदर यांना बाळापूरचे उपविभागीय अधिकारी मोहिते यांनी शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार प्रतिट्रॅक्टरला चोरीची वाळू वाहतूक केली म्हणून एक लाख रुपये दंड करण्याचे आदेश १२ फेब्रुवारी रोजी काढले आहेत. त्यामुळे या चारही वाहनधारकांना बाळापूर तहसील कार्यालयात चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. या चार ट्रॅक्टरधारकांकडून नवीन परिपत्रकानुसार एक लाख रुपयाप्रमाणे दंड वसूल होणार असल्यामुळे वाळू चोरी करणार्या वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत.
बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, अंदुरा, हाता, सागद हे वाळू घाट अद्याप हर्रास झालेले नाहीत. त्यामुळे वाळू चोरी करणार्यांचे फावले होते; मात्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार एक लाखापेक्षा जास्त दंड होण्याच्या निर्णयामुळे वाळू चोरी करणार्यांवर वचक निर्माण झाला आहे.- अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.