अकोला : प्रभागात मूलभूत सुविधांची दाणादाण उडाली असताना भाजपाच्या नगरसेवकांनी प्रभागाकडे सपशेल पाठ फिरवल्याचा आरोप करीत रविवारी सकाळी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक आठमधील असंख्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन छेडले. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याचे पाहून भाजपाचे दोन नगरसेवक गायब झाले. हा प्रकार पाहून नगरसेवकांवरचा रोष नागरिकांनी महापौर विजय अग्रवाल यांच्यावर व्यक्त केला. यावेळी महापौर व नागरिकांमध्ये जोरदार शाब्दीक बाचाबाची झाल्याचे पहावयास मिळाले. सरतेशेवटी प्रभागातील समस्यांवर तोडगा निघत नसल्याचे पाहून आगामी दिवसांत आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील भौरद ग्रामपंचायतमधील गजानन नगर, लक्ष्मी नगर, आश्रय नगर, राव नगर, मेहरे नगर, अमरप्रीत कॉलनी, राम नगर, पोलीस वसाहत, लुम्बिनी नगर आदी दाट लोकवस्तीच्या परिसराचा प्रभाग क्रमांक आठमध्ये समावेश झाला. प्रभाग आठमध्ये भाजपाचे चारही नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. यामध्ये सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, नंदा पाटील, रंजना विंचनकर यांचा समावेश आहे. मागील वर्षभरापासून भाजपाचे चारही नगरसेवक गजानन नगरमधील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८ व ९ कडे ढुंकूनही पाहत नसल्यामुळे मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचा आरोप करीत रविवारी सकाळी साडेदहा वाजता गजानन नगरमधील असंख्य महिला, पुरुष व युवकांनी स्वयंस्फूर्तीने डाबकी रोडवरील जकात नाका येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले. महापौर विजय अग्रवाल तसेच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी प्रत्यक्षात प्रभागाची पाहणी करावी, त्यानंतर निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत महिलांनी रस्त्यावर ठिय्या देणे पसंत केले. दुपारी साडेबारा वाजता महापौर विजय अग्रवाल यांनी नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, नागरिकांचा रोष उफाळून बाहेर आला.